कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्र उभारले आहे. प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी त्याची चाचणी घेण्यात आली. सोमवारी गणेशमूर्ती विसर्जनासाठी यंत्राचा वापर केला जाणार आहे.
तब्बल 83 लाख रुपये किमतीची यंत्रणा आहे. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते. शहरात दरवर्षी सुमारे हजारो घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. त्यासाठी शहरभर ठिकठिकाणी कुंड ठेवण्यात येतात. यंदाही महापालिकेने कुंड ठेवले आहेत. या कुंडात भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर त्या ट्रॅक्टरमधून नेऊन इराणी खणीत विसर्जित केल्या जातात. यापूर्वी तराफ्यावरून नेऊन खणीच्या मध्यभागी मूर्ती विसर्जित करण्यात येत होत्या. परंतु, यंदाच्या वर्षीपासून त्यासाठी स्वयंचलित यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.