file photo 
Latest

पँगाँगवर चीनने पूल बांधला तरी पंतप्रधान मोदी गप्प का? : राहुल गांधी

Arun Patil

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : चीनने पँगाँग सरोवरावर पूल बांधला असून उपग्रह छायाचित्रातून त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ही बाब गेल्या काही दिवसांत समोर आली असून त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अखेर सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावर गप्प का आहेत? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधींनी ट्विटरवर म्हटले आहे की, चीनने पँगाँग सरोवरावर पहिला पूल बांधला. सरकार म्हणाले, 'आम्ही परिस्थितीवर नजर ठेऊन आहोत'. चीनने पँगाँगवर

दुसरा पूल बांधला. सरकार म्हणाले. 'आम्ही परिस्थितीवर नजर ठेऊन आहोत'. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा आणि क्षेत्रीय सार्वभौमत्वाबाबत तडजोड केली जाऊ शकत नाही. भित्र्या आणि विनम्र प्रतिक्रियेने काहीही होणार नाही.

पंतप्रधांनांना देशाची सुरक्षा करावी लागेल. गलवान खोर्‍यातील झटापट, चिनी सैन्याची घुसखोरी अशा चीनसोबतच्या सीमावादावरून राहुल गांधींनी सातत्याने सरकारला विविध प्रश्‍न विचारून घेरले होते.

पँगाँगवर दुसरा पूल बांधल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर केंद्र सरकारतर्फे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता अरिंदम बागची म्हणाले होते की, ज्या स्थानी पुलाचे बांधकाम सुरू आहे ते ठिकाण अनेक दशकांपासून चीनच्या ताब्यात आहे.

भारत या सर्व घटनाक्रमावर नजर ठेऊन आहे. आम्ही पुलाबाबतचे वृत्त पाहिले आहे. हा सैन्याशी संबंधित मुद्दा आहे. आम्ही हे ठिकाण चीनच्या ताब्यात असल्याचे मानतो. संरक्षण मंत्रालय यावर सविस्तर टिपण्णी करू शकेल.

2 ऑक्टोबरपासून 'भारत जोडो' यात्रा

दरम्यान, महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'भारत जोडो' यात्रा राहुल गांधी करणार आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी ध्रुवीकरणाच्या राजकारणाला उत्तर म्हणून या राष्ट्रव्यापी अभियानाची घोषणा उदयपूरमधील चिंतन शिबिरात केली होती. काँग्रेसचे सर्व बडे नेते यात सहभागी होणार आहेत. पाच महिने, 3500 किलोमीटर अंतर आणि एक डझनहून अधिक राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. कन्याकुमारीतून या यात्रेची सुरुवात होईल. सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा देखील यात सहभागी होतील. पदयात्रा, रॅली, सभा असे याचे स्वरूप असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT