Latest

न्यास चाचणीने गुणवत्ता स्तर कसा तपासणार?

अमृता चौगुले

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने एकाच दिवशी 12 नोव्हेंबरला देशपातळीवर राष्ट्रीय संपादणूक चाचणी ( न्यास ) घेण्याचे जाहीर केले. परंतु, दिवाळी सुट्टीनंतर अचानक परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ—मात आहेत. या परीक्षेतून शैक्षणिक गुणवत्ता व स्तर कसा तपासला जाणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्याची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता व स्तर पाहण्यासाठी भारत सरकार शालेय शिक्षण विभाग व साक्षरता विभागाच्या वतीने देशपातळीवर एकाचवेळी 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेण्यात येणार आहे. तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या वर्गांतील निवडक विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील शाळांची रँडम सॅम्पलिंग पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.

कोरोना संसर्गामुळे तिसरी, पाचवी व आठवी या वर्गांपैकी शहरी भागातील फक्त आठवीचे वर्ग सुरू आहेत. याशिवाय ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क व नेटवर्कची समस्या कायम आहे. कोरोनामुळे शिक्षण विभागाने दोन वर्षांत कोणतीच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलले आहे. पहिलीचे कोणतेही वर्ग सुरू नाहीत, विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकांचे तोंडही पाहिलेले नाही. काही विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख झालेली नाही. मग, तिसरीचे विद्यार्थी चाचणी परीक्षेत काय लिहिणार, असा प्रश्न पालक, शिक्षकांना पडला आहे.

परीक्षेसाठी शासनाकडून घाईगडबड

'न्यास' चाचणी घेताना शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञांनी कोरोनामुळे बदलेल्या शैक्षणिक परिस्थितीचा विचार केलेला नाही. शहरी व ग्रामीण शाळा सुरू आहेत का? विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणार्‍या अडचणी लक्षात घेतलेल्या नाहीत. चाचणी परीक्षा घेताना शासनाने घाईगडबड केली आहे. मोजक्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन गुणवत्ता तपासणे जिकीरीचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षा अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा होता, अशी भावना शिक्षक, पालकांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील 207 शाळांमधील 6 हजार 73 विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यातील निवडलेल्या शाळांमधील 232 वर्गांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तिसरी ते पाचवी सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत आणि आठवी व दहावीची 10.30 ते 12.30 अशी चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. क्षेत्रीय अन्वेषकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
– डॉ. आय. सी. शेख, जिल्हा नोडल अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT