मुंबई/अमरावती : पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद्गाराचे समर्थन केल्यामुळे उदयपूरपाठोपाठ महाराष्ट्राच्या अमरावती शहरातही एकाचा बळी घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. उदयपूर येथे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद उमटत असतानाच अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे (54) यांची गेल्या 21 जून रोजी अमरावतीत भररस्त्यात अडवून गळा चिरून झालेली हत्याही याच प्रकरणातून झाल्याचे आता समोर येत आहे.
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लिहिलेला मजकूर उमेश कोल्हे व्हॉट्सअॅपवर पाठवत होते म्हणून ही हत्या करण्यात आली. अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी जनावरांचा डॉक्टर युसूफ खान बहादुर खान याला अटक केली आणि त्याच्या कबुलीतून नुपूर शर्मा प्रकरणाचा या हत्येशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिल्यामुळेच कोल्हेंची हत्या झाल्याचे अमरावतीचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले.
कोल्हे हे नुपूर शर्माला पाठिंबा देत असून तसा मजकूर व्हॉट्सअॅपवर पसरवत आहेत असा मेसेज या डॉक्टर खान यानेच व्हॉट्सअॅपवर टाकला. त्यातून कोल्हेंच्या हत्येसाठी चिथावणीच दिली गेली.
21 जून रोजी कोल्हे रात्री 10 च्या सुमारास आपले मेडिकल दुकान बंद करून स्कूटरवरून घरी निघाले. त्यांच्यासोबत असलेला मुलगा संकेत (27) आणि पत्नी वैष्णवी हे दोघे दुसर्या स्कूटरवर होते. कोल्हे प्रभात चौकातून जात असताना बाईकवर आलेल्या दोघांनी अचानक त्यांची स्कूटर अडवली. त्यापैकी एकाच्या हातात चाकू होता. त्यांनी कोल्हेंच्या मानेवर सपासप वार केले. कोल्हे जमिनीवर कोसळले. हा प्रकार पाहून मुलाने स्कूटर थांबवली आणि तो कोल्हेंच्या मदतीसाठी धावला. तोपर्यंत आणखी एक जण बाईकवर आला आणि ते तिघे पसार झाले.
आरोपींना उमेश कोल्हे यांचे शिर धडावेगळे करायचे होते; पण तोवर संकेत येऊन धडकल्याने आरोपी पळून गेले. या हत्येचे कारण आधी स्पष्ट नव्हते. ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणातून झाली असावी, असा संशय आल्याने या प्रकरणाचा तपास एनआयएने करावा, अशी विनंती महाराष्ट्र पोलिसांनीच केंद्राला केली आणि मग एकेक आरोपी पकडला जाऊ लागला. डॉ. खानला अटक झाल्यानंतर या हत्येचा नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. गुन्ह्याचा तपास 'एनआयए'कडे देण्यात आला असून, 'एनआयए' अधिकारी शनिवारी अमरावतीत दाखल झालेले आहेत.
उमेश कोल्हे यांच्या मागावर आरोपी असल्याचे एक सीसीटीव्ही फुटेजही 'एनआयए'ला उपलब्ध झाले आहे. डॉ. खान याच्याशिवाय पोलिसांनी मुदस्सिर अहमद उर्फ सोनू रजा शेख (22), शाहरुख पठाण उर्फ बादशहा हिदायत खान (25), नानू उर्फ अब्दुल तौफीक (24), अतिब रशिद (22) आणि शोएब उर्फ भुर्या खान या पाच जणांना अटक करण्यात आली. यापैकी भुर्या खानने उमेश कोल्हे यांच्यावर वार केले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अमरावतीत अनेकांना धमक्या
उमेश कोल्हे यांच्या खुनापूर्वी अमरावतीत नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणार्या तीन-चार जणांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सगळ्यांना माफी मागायला भाग पाडण्यात आले होते.