आगामी वर्ष हे महाराष्ट्राच्या दृष्टीने निवडणुकांच्या धामधुमीचे वर्ष आहे. 2022 या वर्षात एप्रिल ते डिसेंबरअखेर राज्यातील 23 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्याशिवाय कोल्हापूरसह 27 जिल्हा परिषदा आणि 298 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचाही धुमधडाका होणार आहे. त्याचबरोबर 222 नगरपालिका आणि नगर परिषदांतही निवडणुकांचे धूमशान रंगणार आहे. जवळजवळ सारे राज्यच या निवडणुकांत गुंतणार असल्याने या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका ठरणार आहेत. 2024 मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांची ही रंगीत तालीमच ठरणार असल्याने सत्तारूढ महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यासह अन्य राजकीय पक्षांनी आतापासूनच या मिनी विधानसभेची तयारी चालवली आहे. राज्यात सध्या जो आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे, तो या निवडणूकपूर्व प्रचाराचा भाग आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, मालेगाव, परभणी, लातूर, नांदेड, चंद्रपूर अशा 23 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आगामी वर्षात उसळणार आहे. या महापालिकांची लोकसंख्या साडेतीन कोटींच्या घरात आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली, सातार्यासह 27 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्याही निवडणुकांच्या नगार्यावर टिपरी पडली आहे. महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका/नगर परिषदा यांच्या निवडणूक जवळजवळ सार्या राज्यातच होत असल्याने त्यानंतर दोनच वर्षांत होणार्या विधानसभा निवडणुकांवर या निवडणुकांच्या निकालाचे प्रतिबिंब पडण्याची शक्यता निश्चितच आहे.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू आहे आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांमागे चौकशीचा ससेमिराही लागला आहे. विरोधी पक्षाचे नेते महाविकास आघाडीवर अक्षरशः तुटून पडत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचे आणि त्यातून त्या त्या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे भाजपचे डावपेच असल्याचे एकूणच मोर्चेबांधणीवरून दिसून येते. भाजपचा हा पवित्रा लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील नेत्यांनीही आरोपांना प्रत्युत्तर देत प्रत्यारोप सुरू केले आहेत. पुढील वर्षीच्या या निवडणुकांमुळे शह-काटशहाच्या या राजकारणाला उकळी आली आहे, हे दिसतच आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील आरोप आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून भाजप नेत्यांवर होणारे आरोप यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे आणि पुढील वर्षातील निवडणुका उंबरठ्यावर येतील, तसे हे वातावरण तापत जाणार आहे. शेवटी आता होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा शेवट काय होणार, त्यातून काय निष्पन्न होणार, हे सांगणे कठीणच आहे.
मिनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा लावला असला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या निवडणुकांत असे चित्र दिसू शकेल; पण जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी चौरंगी लढतही होण्याची शक्यता आहे. त्यात स्थानिक आघाड्याही आपापले गड राखण्याचा प्रयत्न करतील. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांतही हाच बहुरंगी पॅटर्न दिसण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षातील आगामी निवडणुका या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार, हे स्पष्टच आहे. या निवडणुकांत जास्तीत जास्त जागा जिंकून विधानसभेची भक्कम पायाभरणी करण्यासाठी प्रत्येक पक्षाची, आघाडीची धडपड राहणार आहे. त्यामुळे या निवडणुका कमालीच्या अटीतटीने आणि ईर्ष्येने लढवल्या जातील. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची धार वाढतच जाणार, यात शंका नाही.
महापालिका निवडणुकांत मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वात प्रतिष्ठेची ठरणार आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तर भाजपला या बालेकिल्ल्याला सुरुंग लावायचा आहे. शिवसेनेसोबत राहून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला आपले हात-पाय पसरायचे आहेत, तर स्वबळावर लढताना काँग्रेसला आपले गमावलेले स्थान मिळवण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुुंबई महापालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.