Stock Market 
Latest

निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता

Arun Patil

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण 738.35 अंक व 2528.86 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 17026.45 अंक व 57107.15 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्स मध्ये एकूण 4.16 टक्के व 4.24 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. शुक्रवारच्या सत्रात भांडवल बाजारमूल्य एकूण 7.36 लाख कोटींनी कमी झाले. सर्वोच्च स्थानापासून आजपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्स्चेजचे भांडवली बाजारमूल्य एकूण सुमारे 16 लाख कोटींनी कमी झाले. 19 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च पातळीवर असताना भांडवल बाजारमूल्य सुमारे 2 लाख 74 हजार कोटींच्या जवळपास होते, ते मूल्य शुक्रवार अखेर सुमारे 2 लाख 58 हजार कोटींपर्यंत खाली आले. दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

* आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार्‍या घटनांचे पडसाद रुपया चलनावरदेखील झाले. रुपया डॉलरच्या तुलनेत 36 पैसे कमजोर होऊन 74.87 रुपये प्रति डॉलर स्तरावर बंद झाला. संपूर्ण सप्ताहात मिळून एकूण रुपया 59 पैसे कमजोर झाला. 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांचा व्याजदर 4 बेसिस पॉईंट्सनी कमी होऊन 6.33 टक्क्यांपर्यंत खाली आला.

* आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भावदेखील गडगडले. ब्रेंट क्रूड 9.21 डॉलर प्रती बॅरल म्हणजेच 11.2 टक्क्यांनी घटून 73.02 डॉलर प्रती बॅरल भावापर्यंत खाली आले. तसेच अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रुड 10.10 डॉलर प्रती बॅरल म्हणजेच 12.9 टक्क्यांनी घटून 68.29 डॉलर प्रती बॅरल किमतीपर्यंत खाली आले.

एप्रिल 2020 नंतरची कच्च्या तेलाच्या किमतीमधील ही सर्वांत मोठी घसरण आहे. नुकतेच ओपेक प्लस या तेल उत्पादक देशांच्या संघटनेवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने प्रत्येक देशाने स्वतःजवळचे राखीव तेलसाठे वापरास काढण्याची विनंती भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया या राष्ट्रांना केली होती.

यामुळे कच्च्या तेलाची बाजारातील आवक वाढून तेलाचे भाव कमी होतील. तसेच ओपेक प्लस तेल उत्पादक देशांवर उत्पादन वाढवण्यासाठी दबाव वाढेल. या विनंतीला मान देऊन भारताने 50 लाख बॅरल राखीव तेलसाठा वापरास बाजारात आणला. या सर्वांचा एकत्रित परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला. लवकरच कच्च्या तेलाचा भाव (ब्रेंट क्रूड) 70 डॉलर प्रती बॅरलच्या खाली जाईल आणि लवकरच पेट्रोल डिझेलच्या किमतीदेखील खाली येण्यास मदत होईल, अशी आशा अर्थविश्लेषकांनी व्यक्त केली.

* राकेश झुनझुनवाला यांचा हिस्सा असलेली 'स्टार हेल्थ इन्श्युरन्स'चा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 30 नोव्हेंबर रोजी खुला होणार. या आयपीओद्वारे सुमारे 7249 कोटींचा निधी उभारणीचे लक्ष्य. आयपीओसाठी 870-900 रुपयांचा किंमतपट्टा ठरवण्यात आला आहे. आयपीओ नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान उपलब्ध राहील. नोंदणी पश्चात कंपनीचे बाजार भांडवलमूल्य 51 हजार कोटींच्या घरात पोहोचेल, असा अंदाज असून कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी 100 कोटींचे शेअर्स 80 रुपये प्रति शेअर सवलतीच्या दरात राखीव ठेवले आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीचा स्टार हेल्थमध्ये 17.26 टक्क्यांचा हिस्सा आहे.

* सरकारी बँकांचे खासगीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल. सरकार लवकरच 'द बँकिंग लॉ (अमेडमेट) बिल,2021' संसदेत आणण्याच्या तयारीत. याद्वारे सरकारी बँकांमधील सरकारचा हिस्सा किमान 51 टक्क्यांवरून 26 टक्क्यांपर्यंत खाली आणता येईल, अशी तरतूद करण्यात येणार असल्याची शक्यता. यापूर्वी निती आयोगाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचे खासगीकरण करता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले आहे. अजूनही केंद्र सरकारने बँकांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही; परंतु लवकरच हे विधेयक संसदेत येण्याआधी केंद्रीय मंत्रीमंडळात चर्चेसाठी येणार.

* हिंदुजा उद्योग समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या 'अशोक लेलँड' कंपनीच्या एम.डी. आणि सीईओ पदावरून 'विपीन सोंढी' यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे सोंढी यांचे प्रतिपादन. त्यांचा कार्यभार काही काळासाठी हिंदुजा सांभाळणार.

* संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'क्रिप्टो करन्सी' संदर्भात बिल आणले जाणार. 'क्रिप्टो करन्सी'ला नियमांच्या चौकटीत बसवणारे कायदे बनवले जाणार. यासोबतच रिझर्व्ह बँकेची मान्यताप्राप्त 'क्रिप्टो करन्सी' बाजारात आणली जाणार असून काही अपवाद वगळता सर्व अनिर्बंध खासगी क्रिप्टो करन्सीवर बंदी आणली जाण्याची शक्यता.

* देशातील प्रमुख तेल उत्पादक कंपनी 'बीपीसीएल'च्या निर्गुंतवणुकीस विलंब. सरकारचे यावर्षीचे 1.75 लाख कोटींचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य होणे कठीण. सरकारी अर्थ सचिव सोमनाथन यांची माहिती.

* देशातील सर्वांत मोठी कंपनी 'रिलायन्स इंडस्ट्रीज' आणि सौदी अरेबियाची सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी 'सौदी आराम्को' यांच्यातील 15 अब्ज डॉलर्सचा करार रद्द. 2019 साली सौदी आराम्को रिलायन्स इंडस्ट्रीजमधील तेल व रसायन निर्मिती व्यवसायाचा 20 टक्के हिस्सा खरेदी करणार होती. परंतु दोन वर्षांत परिस्थितीमध्ये बराच फरक पडला. सध्या ऊर्जा उत्पादक कंपन्यांचा ओढा हा सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडे वळत आहे. त्यामुळे इतक्या महाग किमतीवर पारंपरिकरीत्या तेल उत्पादक/ऊर्जा उत्पादन करणार्‍या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी की नाही यासाठी सौदी आराम्को तर्फे फेरविचार करण्यात आला. परंतु रिलायन्सने किमतीबाबत तडतोज करण्यास नकार दिल्याने अखेर करार गुंडाळण्यात आला.

* 19 नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 289 दशलक्ष डॉलर्सनी घटून 640.401 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT