निपाणी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाच दिवसांपासून पावसाने निपाणी परिसरात संततधार कायम सुरू ठेवली आहे. त्यामुळे वेदगंगा पात्राबाहेर आली असून परिसरातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढत्याने तहसील प्रशासन अलर्ट झाले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी सोमवारी नदीकाठावरील गावांना भेट देवून पाहणी केली.
सोमवारी सकाळी येथील कृषी संशोधन केंद्रात 24 तासांमध्ये झालेल्या पावसाची 40.4 मि.मी. इतकी नोंद झाली आहे. तहसील व पोलिस प्रशासनाने पावसाचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजना केल्या आहेत. तहसील प्रशासनाने पावसाचा जोर वाढल्याने खबरदारी घेऊन नोडल अधिकार्यांना सतर्कतेच्या सूचना देऊन हेल्पलाइन सुरू केली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पाच बंधारे पुन्हा पाण्याखाली
दरम्यान, कोकण भागातील पाटगांव, राधानगरी, काळम्मावाडी धरण क्षेत्रात जोरदार होणारा पाऊस आणि निपाणी भागात असलेल्या संततधार पावसामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नदी पाणीपातळीत झपाट्याने होत आहे. पाणी पात्राबाहेर पडल्याने वेदगंगा नदीवरील जत्राट भिवशी, अकोळ-सिदनाळ, हुन्नरगी ममदापूर, कुन्नूर-भोजवाडी तर दूधगंगा नदीवरील कुन्नूर-बारवाड हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पर्याय मार्गाने वळविण्यात आली आहे, तर परिसरातील लहान-मोठे संपर्क रस्तेही बंद झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जत्राट वेस लखनापूर पुलावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे.
महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत क्षणोक्षणी वाढ होत असून यावर्षी नदीकाठच्या नागरिकांना दुसर्यांदा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
अद्याप नदी काठावरील गावांना धोका पोहोचलेला नाही. प्रशासनाने धोका पोचणार्या गावांबाबत योग्य ती खबरदारी घेतली आहे. शिवाय आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
– प्रवीण कारंडे, तहसीलदार, निपाणी
निपाणीचा जवाहरलाल तलाव सलग चौथ्या वर्षी भरला
निपाणी शहराची जीवनदायिनी असलेला जवाहरलाल तलाव गेल्या तीन दिवसापासून तलावाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे 46 फूट भरला असल्याची माहिती नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली.
तलावाच्या पश्चिमेकडील सांडव्यातून वाहून जाणारे पाणी लाकडी बरगे घालून अडवण्यात आले आहे. जवाहरलाल तलाव भरल्याने निपाणी शहराचा वर्षभराचा पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. गतवर्षी 22 जुलै रोजी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. 2019 मध्ये 5 ऑगस्ट रोजी तलाव भरला होता.सलग चौथ्या वर्षी तलाव भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
जून महिन्यात तलावात 33.फूट इतका पाणीसाठा होता. नगराध्यक्ष जयवंत भाटले, व सहकारी नगरसेवकांनी भरलेल्या तलावाची पाहणी केली. येत्या दोन दिवसात केयुआयडीएफसी, जैन इरिगेशन व पालिका पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन 24 तास पाणी सोडण्याबाबतचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.