कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी : वाहनांच्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टाची वाटचाल सुरू असतानाच केंद्र सरकारने आता विमानाच्या पेट्रोलमध्ये 50 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी केंद्र सरकारने ब्राझील सरकारची मदत घेण्याचे ठरविले आहे. भारतात सध्या 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगाचे आकारमान 2 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारू शकते. भारतीय साखर कारखानदार संघटनेच्या (इस्मा) वतीने पर्यायी इंधन या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
देशाच्या हवाईदल प्रमुखांबरोबर चर्चा आयोजित केली जाईल, असे निर्देशित करत नितीन गडकरी यांनी विमानाच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे धोरण कार्यान्वित झाले, तर इथेनॉलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढून साखर कारखानदारीला चांगले दिवस येतील, असा आशावादही व्यक्त केला. ब्राझीलमध्ये सध्या विमानाच्या पेट्रोलमध्ये 50 इथेनॉल मिश्रणाचे धोरण आहे. गडकरी यांनी देशातील साखर कारखानदारांना ब्राझीलमधील हवाई दलाच्या इथेनॉल मिश्रणाची माहिती घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ब्राझीलमध्ये जर हा कार्यक्रम यशस्वी ठरू शकतो, तर भारतामध्ये तो यशस्वी होण्यात कोणतीही अडचण असणार नाही.
गडकरी यांनी बहुइंधनावर (फ्लेक्सी फ्यूएल) चालणार्या वाहनांना अनुमती देण्याविषयी सर्वोच्च न्यायालय केव्हा निर्णय घेते याकडे केंद्र सरकारचे लक्ष लागून राहिल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात या विषयीचा आराखडा तयार आहे. आपण दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबर अॅटोरिक्षाही 100 टक्के इथेनॉलवर चालवू शकतो. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, टोयोटा, होंडा या कंपन्यांसुद्धा फ्लेक्सी फ्यूएलवर चालणारी इंजिन्स बनवू शकतात. सध्या वाहनांमध्ये पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 10 टक्क्यांजवळ पोहोचले आहे. 2025 मध्ये ते 20 टक्क्यांवर पोहोचेल. इंडियन ऑईल कंपनीच्या अभ्यासामध्ये देशातील सद्य:स्थितीत चालू असलेल्या वाहनांपैकी 13 टक्के वाहनांमध्ये कोणताही बदल न करता इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरता येणे शक्य असल्याचा निष्कर्ष आहे आणि त्यामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेत कोणताही फरक पडत नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.