शहरात एमडी ड्रग्ज विक्रीचे मोठे रॅकेटच सक्रिय असल्याची बाब समोर आली असली तरी, प्रत्यक्षात गल्लोगल्लीतील पानटपऱ्यांवर अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याची वस्तुस्थिती आहे. तरुणाई, गोगो, मँगो गोळी अन् मावा गुटख्याच्या विळख्यात पुरती सापडली असून, या पदार्थांवर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री सुरू आहे. यामुळे पोलिसांसह संबंधित प्रशासनाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरात एमडी पावडर निर्मितीचे कारखाने सापडल्याने एकच खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी ही कारवाई केल्याने, नाशिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे पानटपऱ्यांवर बंदी असलेल्या अमली पदार्थांची सर्रास विक्री केली जात असल्याने, यांच्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल आता नाशिककरांकडून विचारला जात आहे. या पानटपऱ्यांवर गोगो पेपर अर्थात पेपरमध्ये तंबाखू, गांजा, चरस, अफीम हे पदार्थ भरून त्याची विक्री केली जाते. गोगो पेपरला 'रॉ' असेदेखील नाव आहे. चिलमला पर्याय म्हणून त्याचा वापर केला जात असून, तरुणाईकडून ही नशा केली जाते. तसेच चॉकलेटसारखी दिसणारी मँगो गोळीही (नशायुक्त पावडर) चांगलीच प्रसिद्ध आहे. याशिवाय 'मावा' नावाच्या तंबाखूजन्य प्रकारालाही जिल्हाभर मागणी आहे. यात बारीक कुटलेली सुपारी, विशिष्ट क्रमांक असलेली तंबाखू, चुना एकजीव करण्यासाठी अगदी थोडे पाणी वापरले जाते. हे सर्व मिश्रण रबरी खडबडीत टायरच्या तुकड्यांवर तासन्तास घासले जाते. त्यामुळे ते एकजीव होते. नशेचा हा प्रकारदेखील तरुणाईमध्ये विशेष प्रसिद्ध असून, त्याची सर्रास पानटपऱ्यांवर विक्री केली जात आहे.
पानटपरीचालकांना अभय
पोलिस यंत्रणेसह अन्न, औषध प्रशासन या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याने, पानटपरीचालकांना अभय मिळत आहे. या व्यसनी जिनसा विकत घेणाऱ्या ग्राहकांमध्ये तरुणांचा मोठा समावेश आहे. विशेषत: महाविद्यालयीन तरुण या नशेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. पानटपऱ्या व लहानसहान दुकानांमध्ये हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने, पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.
गुटखाबंदी कागदावरच
राज्यात गुटखाबंदी असतानाही पावलोपावली गुटख्याची विक्री केली जाते. शेजारच्या राज्यातून प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात गुटखा आणला जातो. रेल्वेमधूनही गुटखा सहज उपलब्ध होतो. एक पुडी पानमसाल्याची आणि त्यासोबत तंबाखूची लहान पुडी विकली जाते. या दोन पुड्या वीस रुपयांपर्यंत विकल्या जातात. पानटपरी, किराणा दुकानावर त्या सहज मिळतात. पेट्रोलपंपाजवळ असलेल्या ऑइल विक्रीच्या ठिकाणीदेखील गुटखा विक्री केेली जाते.
अमली पदार्थांची अवैध वाहतूक
गुटख्याच्या पार्सलची जिल्हाभरात अवैध मार्गाने वाहतूक केली जाते. या व्यवसायातील प्रचंड उलाढालीमुळे अनेकांचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत. सुवासिक तंबाखूवर बंदी असतानाही शहरात इतकी तंबाखू विनाअडथळा येतेच कशी, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आश्चर्य म्हणजे बंदी पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे सर्वश्रुत असताना गेल्या वर्षभरात पानटपऱ्यांवर एकही मोठी कारवाई झाली नाही.
अल्पवयीन आहारी
शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक स्थळ असलेल्या शंभर मीटर परिसरात अमली पदार्थ विक्रीस बंदी असतानाही शहरातील बहुतांश भागांत अशा प्रकारची विक्री केली जात आहे. अल्पवयीन या नशेच्या आहारी जात आहेत. नशेसाठी या अल्पवयीनांकडून चोरी व अन्य गुन्ह्याचे कृत्य केले जात आहेत.
शैक्षणिक प्रतिबंधित परिसरात नियमित तपासणी केली जात असून, कोणी अमली पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कोटपा कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. तसेच शहरात विशेष मोहीम उघडून अशाप्रकारे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील.
– प्रशांत बच्छाव, पोलिस उपआयुक्त, गुन्हे
हेही वाचा :