Latest

नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून ‘इतक्या’ कोटींचे घबाड केले हस्तगत

गणेश सोनवणे

नाशिक, धुळे : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विकास विभागांतर्गत येणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल यांच्या नाशिक व पुणे येथील घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी (दि.26) झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत एसीबीच्या हाती मोठे घबाड लागले आहे. बागूल यांच्या नाशिकमधील राहत्या घरातून 98 लाखांची, तर पुणे येथील घरातून 45 लाखांची रोकड एसीबीच्या पथकाने हस्तगत केली आहे.

हरसूल येथील मुला-मुलींच्या वसतिगृहातील सेंट्रल किचनचे काम सुरू करण्यासाठी लागणारा कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात कामाच्या दोन कोटी 40 लाख रुपये रकमेच्या 12 टक्क्यांप्रमाणे 28 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी कार्यकारी अभियंता बागूल यांनी केल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली होती. गुरुवारी (दि.25) सायंकाळी संशयित बागूल यांच्या उंटवाडीनजीक असलेल्या नयनतारा येथील त्यांच्या निवासस्थानी पथकाने सापळा रचून लाच स्वीकारत असतानाच एसीबीने त्यांना ताब्यात घेतले होते.

दरम्यान, एसबीसीच्या पथकाकडून बागूल यांच्या नाशिक, पुणे, धुळेसह परराज्यातीलही मालमत्तेची चौकशी केली जात आहे. बागूल यांच्याकडे नाशिकसह अन्य ठिकाणी स्थावर व जंगम मालमत्तेचे मूल्य कोट्यवधींच्या घरात असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. त्यात जमीन, आलिशान फ्लॅट्सचा समावेश आहे. तसेच कोट्यवधीचे दागिनेही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रविवारपर्यंत पोलिस कोठडी
लाचखोर दिनेशकुमार बागूल यांना एसीबीने शुक्रवारी (दि.26) न्यायालयात हजर केले. त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यात संशयास्पद कागदपत्रे व काही दस्तऐवज आढळले आहेत. त्याच्या तपासासाठी कोठडीची मागणी एसीबीने केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून बागूल यांना न्यायालयाने रविवार (दि.28)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाबाहेर गर्दी झाली होती.

धुळे येथील बंगल्याचीही घेतली झडती

आदिवासी विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या धुळ्यातील बंगल्याचीदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून झडती घेण्यात आली. त्या घरात सध्या खासगी शिकवणी सुरू असल्याची बाब प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

बागूल यांच्यावर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. त्यात बागूल यांचे वास्तव्य धुळ्याच्या देवपूरमधील आदर्शनगरमध्येही असल्याची बाब उघडकीस आली. आदर्शनगरात असलेल्या एका बंगल्याची माहिती या पथकाला मिळाल्याने त्यांनी या बंगल्याची तपासणी करण्याची सूचना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयास दिली. त्यानुसार एक पथक या निवासस्थानी पोहोचले. बंगल्यात एका खासगी शिकवणीचालकाचे क्लास सुरू असल्याची बाब पुढे आली. दरम्यान, शिकवणी चालकाने भाडेतत्त्वावर हा बंगला घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज असून, या बंगल्यात असलेल्या वस्तूंची तपासणी करण्यात आली. मात्र, त्याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. खासगी शिकवणी चालकाचा जबाब घेण्यात आला आहे. बागूल यांचा धुळ्यात बंगला असला, तरीही त्यांच्या परिवारातील सदस्य नाशिक येथेच वास्तव्याला असल्याची बाब तपासात पुढे येत आहे. मात्र, त्यांचे काही नातेवाईक धुळ्यात वास्तव्यास असून, त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही, हेदेखील तपासून पाहिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT