नारळाच्या बागेमध्ये नारळ रोपाची लागवड केल्यानंतर त्यांना पहिली दोन वर्षे सावलीची तसेच आधार देणे आवश्यक असते.
रोपांना आधार देणे : नारळ रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार देणे आवश्यक असते आणि म्हणूनच त्यासाठी लागणार्या साहित्याची जमवाजमाव अगोदर पासूनच करणे आवश्यक आहे. रोपे लावल्यानंतर पश्चिमेकडील वार्याने ते हलू नयेत म्हणून रोपांच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपांच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.
सावली : झाडास भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते हे जरी खरे असले, तरी नारळ रोपांना परिहली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे अत्यावश्यक आहे. विणलेले झाप, गवताच्या तट्या करून कृत्रिम सावली करता येते; परंतु ही खर्चिक बाब आहे. त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी तसेच पपई यांची लागवड करावी, जेणेकरून झाडांना सावली मिळेल आणि त्यापासून उत्पन्नही मिळेल. केळीची लागवड केल्यास एक एकरचा विचार करता एकरात ओळीत 7 नारळांची झाडे बसतात. प्रत्येक नारळाभोवती चार दिशांना अडीच फुटांवर केळीची लागवड झाल्यास 28 केळीची लागवड करता येईल. त्यातून काही लागवडीचा खर्च सहज भागविता येईल. तसेच रोपांच्या चारही बाजूस अडीच ते तीन फुटांवर 4 ते 5 फूट उंचीच्या गिरीपुष्पाच्या (ग्लिरिसिडिया) फांद्या लावाव्यात, यामुळे अनेक फायदे होतात. रोपांना आधार देता येतो. लावलेल्या काठ्यांना टोकाकडे फांद्या फुटून त्याचा रोपाला सावली म्हणून उपयोग होतो. मुळांवर असलेल्या नत्र ग्रंथीमुळे नत्रदेखील मिळते तसेच पुढील पावसाळ्यात वाढलेल्या फांद्या तोडून रोपांना हिरवळीचे खत पुरविता येते.
योग्य प्रकारे खत-पाण्याचे नियोजन
खते : नारळ झाडे खताला चांगले प्रतिसाद देतात असे प्रयोगाअंती दिसून आले आहे. झाडांपासून उत्पादन कमी मिळणे, वाढ खुरटलेली राहणे, नारळ फळांना तडे जाणे, फळे लहान असतानाच मोठ्या प्रमाणावरच गळ होणे या मागील प्रमुख कारण म्हणजे त्यांना होणारा अपुरा अन्नपुरवठा होय. अनेकवेळा नारळ झाडांना फक्त शेणखत अथवा युरिया खतच दिले जाते. हे अयोग्य आहे. नारळ झाडास नत्र, स्फुरद आणि पालाश अशा तिन्ही अन्नघटकांच्या योग्य प्रमाणात पुरवठा होणे महत्त्वाचे आहे. म्हणून नारळ झाडास वयोमानानुसार मागील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे खते द्यावीत.
नत्र आणि पालाश खताच्या मात्रा समप्रमाणात विभागून जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी अशा तीन वेळा द्याव्यात. शेणखत व स्फुरद खते इतर खतांबरोबर जूनमध्ये एकाच वेळी द्यावीत. रोप लावल्यानंतर पहिल्यावर्षी रोपांची मुळे 30 सें.मी. अंतरापर्यंत पसरलेली असतात. त्यामुळे खते खोडापासून 30 सें.मी. अंतरापर्यंत सभोवती विखरून टाकावीत आणि खुरप्याच्या सहाय्याने मातीत मिसळावीत. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना 30 से.मी. अंतर वाढवत जावे व पाचव्या वर्षी त्यापुढे 1.5 ते 1.80 मीटर पर्यंतच्या अंतरात ती पसरून टाकावीत आणि मातीत मिसळावीत. या खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही नारळास गरज आहे.
त्या द़ृष्टीने या केंद्रावर प्रयोग घेण्यात आले असून, त्यामध्ये ऑरमिकेम हे सूक्ष्म अन्नद्रव्य असलेले खत प्रतिमाडास प्रतिहसा 5 ग्रॅम याप्रमाणे इतर खताबरोबरच 3 हप्त्यांत दिल्यास उत्पादनात चांगल्या प्रकारची वाढ दिसून आली आहे. तसेच बर्याच वेळा शेतकरी बाजारात उपलब्ध असलेल्या युरिया खताचीच मात्रा नारळ झाडास देतात. नारळास नत्र खताबरोबरच पालाश खताचीही मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि म्हणून पालाश खत देणे गरजेचे आहे. जर एकच अन्नद्रव्ये असलेली खते बाजारात उपलब्ध नसतील, अशावेळी मिश्र खतांचा वापर करावा. नारळास सेंद्रिय स्वरूपातही खते देऊन त्याची आवश्यक गरज गिरीपुष्पाची लागवड करून त्याचा वापर, पावसाळ्याच्या सुरुवातीला नारळाच्या अळ्यामध्ये धैचा, ताग, पुरारिया या हिरवळीच्या खतांची पेरणी तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करता येईल.
पाणी व्यवस्थापन : खताप्रमाणेच नारळाच्या झाडांना पाण्याची आवश्यकता आहे. नारळ झाडांना एकाच वेळी खूप पाणी देण्यापेक्षा थोडे थोडे पाणी (गरजेइतके) अनेक वेळा देणे फायद्याचे ठरते. जमिनीच्या प्रकारानुसार नारळाच्या पाच वर्षांवरील झाडांना हिवाळ्यात 4 ते 5 दिवसांनी आणि उन्हाळ्यात 2 ते 3 दिवसांनी पाणी द्यावे. रोप लावल्यानंतर त्या वर्षी मात्र रोपाला एक दिवसाआड करून पाणी द्यावे. पाणीपुरवठा करण्यासाठी केलेले आळे पुरेशा रुंदीचे असणे आवश्यक आहे. रोप लावल्यानंतर रोपाच्या सभोवार 30 सें.मी. रुंदीचे आळे करावे. रोपाच्या वयोमानाप्रमाणे अळ्याची रुंदी वाढवत नेऊन 5 वर्षांनंतर नारळाच्या झाडाच्या सभोवार 1.5 मी. रुंदीचे आळे करून पाणी द्यावे. आळ्यामध्ये दर चार दिवसांनी हिवाळ्यात 180 ते 200 लिटर तर उन्हाळ्यात 200 ते 240 लिटर पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने नारळाच्या झाडांना पाणी देणे सर्वात उत्तम. त्यामुळे पाण्याची बचत होते. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे गेली काही वर्षे ठिबक सिंचन पद्धतीने नारळ झाडांना पाणी दिले जात आहे. या पद्धतीने हिवाळ्यात सुमारे 30 लि. पाणी तर उन्हाळ्यात 40 लि. पाणी दर दिवशी दिले तरी पुरेसे होते.
योग्य आंतरपिकांची लागवड : नारळाच्या बागेमध्ये नारळ रोपाची लागवड केल्यानंतर त्यांना पहिली दोन वर्षे सावलीची गरज असल्याने रोपांच्या चारही दिशांना 60 ते 75 सें.मी. अंतरावर केळीचे चार मुणवे लावणे जरुरीचे आहे. जेणेकरून सावली तर होईलच त्याचबरोबर केळीची दोन पिके घेता येतील; परंतु त्यानंतर केळी काढून टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर अशा नवीन नारळ बागेत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने केळी आणि अननसासारखी फळपिके, भाजीपाला, कंदपिके, हळद, आल्यासारख्या मसाला पिकांची लागवड करून अधिक उत्पादन घेता येईल. नारळाचे झाड 5 वर्षांचे झाल्यानंतर त्याची खाणारी मुळे आडवी 1.8 मीटर तर खोलवर 100 ते 120 सें.मी. पर्यंत पसरतात. त्यामुळे नारळाचे झाड बागेतील फक्त 25 टक्के जागा उपयोगात आणते. त्यामुळे शिल्लक 75 टक्के जागेवरती आपणास तात्पुरती अथवा कायमस्वरूपी विविध पिकांची लागवड करता येईल. त्याचबरोबर नारळाच्या पूर्ण वाढलेल्या बागेमध्ये 50 टक्के सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत असतो.
नारळ बागेमध्ये नारळापासून 6.5 फुटांवर केळीची लागवड, दोन केळीच्यामध्ये अननसाची लागवड तर दोन केळीच्यामध्ये 2 दालचिनीची झाडे, चार नारळाच्या मध्यभागी एक जायफळचे कलम आणि प्रत्येक नारळावर दोन काळीमिरी या प्रमाणे मसाला पिके तर नारळाच्या चार कोपर्यांवर सुरणाचे एक झाड अशाप्रकारे एक एकर नारळाच्या बागेमध्ये लागवड केल्यास नारळाची-7 झाडे, केळी-246, अननस-34, दालचिनी-246, जायफळ-54, काळीमिरी-140 आणि सुरण-123 अशी एकूण झाडे बसतात.
हा आराखडा नवीन लागवड केलेल्या नारळ बागेबरोबरच योग्य अंतर ठेवलेल्या जुन्या नारळ बागेमध्ये वापरता येऊ शकतो. अशा प्रकारे लागवड केल्यास केळीची 1.5 वर्षात, अननसाची 2 वर्षांत, दालचिनी व सुरण तिसर्या, जायफळ आणि काळीमिरी 5 ते 6 वर्षांनी उत्पादन देतील. अशा या 'लाखीबागेच्या' संकल्पनेच्या आराखड्याची कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. अशा नारळ बागेत नारळ उत्पादनावर विपरीत परिणाम न होता नारळाचे 40 टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे.
– डॉ. दादासाहेब खोगरे
किडी
* गेंड्या भुंगा : या किडीचा भुंगा नारळाचा नवीन कोंब खातो. शेंड्याजवळ भोके पडलेली दिसतात व नवीन येणारी पाने त्रिकोणी कापल्यासारखी दिसतात.
उपाय : उपद्रव झालेल्या झाडांना तारेच्या हुकाच्या सहाय्याने भुंगे बाहेर काढून नष्ट करून टाकावेत.
* सोंड्या भुंगा : अळ्या झाडाचा मऊ भाग खातात व खोड आतून पोखरतात. प्रादुर्भाव झाल्याचे बाहेरून ओळखता येत नाही. प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या बुंद्ध्यावर छिद्रे दिसतात व त्यातून ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्राव दिसतो.
* काळ्या डोक्याची अळी : पानातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे पाने करपल्यासारके दिसतात.
* इरिओफाईड कोळी : सूक्ष्म कीड फळाच्या देठाच्या खालल्या भागातून रस शोषते व तांबुस चट्टे दिसतात व फळांचे आवरण तडकते परिणामी नारळ लहान राहतात व गळ होते.
रोग :
* कोंब कुजणे : 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
* फळांची गळ : 1% बोर्डो मिश्रणाच्या दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने कराव्यात.
* करपा : 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
* खोडावरील डिंक्या रोग : झाडांना योग्य प्रमाणात खते, पाणी द्यावे. बुंध्यावरील डिंक व मेलेली साल खरवडून त्या जागी बोर्डो पेस्ट लावावी.
काढणी व उत्पादन :
* जातीनुसार पाचव्या ते सातव्या वर्षापासून उत्पन्न सुरु होते.
* फळ धारणा झाल्यापासून 7 ते 12 महिण्यातजरुरी प्रमाणे नारळ काढावेत.
* फळधारणेपासून 6 ते 7 महिन्यांचे फळ शहाळ्यासाठी काढावे.
* सुक्या खोबर्यासाठी 11 ते 12 महिन्याचे फळ काढावे.
* प्रत्येक झाडापासून 80 ते 100 नारळ मिळतात. नारळाचे आर्थिक आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असते.
* नारळ कुशल मजुराकडून काढणी करावी.