सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : आगामी सोलापूर मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासून प्रभागांमध्ये जोरदार तयारी सुरू करावी. याचबरोबरच काँग्रेस सदस्य नोंदणीचे कामही जोमावे करावे. जास्त नोंदणी करणार्यांना तिकीट देण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी सोलापुरात केले.
शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे मनपा निवडणुकीत सत्ता आणण्याच्या दृष्टीने आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नाना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर शहर टॉप टेनवर आहे, मात्र आता ते टॉप वन वर येण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न व्हावेत. ग्रामीणमध्येदेखील असे प्रयत्न गरजेचे आहे. मनपा निवडणुकीसाठी मी स्वत: लक्ष घालणार असून सर्वांनी समन्वयाने काम करावे.
गत मनपा निवडणुकीत तत्कालीन फडणवीस सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करत सत्ता काबीज केली. हजारो कोटींच्या निधीचे गाजर दाखविले, मात्र प्रत्यक्षात ठेंगा दाखविला. शहरात काँग्रेस काळात झालेल्या पाणीपुरवठा योजनांमुळे लोकांना पाणी मिळत आहे. तेव्हा यंदाच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करुन काँग्रेसची सत्ता आणू, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.
फडणवीस सरकारने शिवरायांच्या नावे शेतकरी कर्जमाफीची फसवी योजना आणून शेतकर्यांबरोबरच शिवरायांचा अवमान केला, याउलट महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुलेंच्या नावे योजना आणून शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यात सत्तेपेक्षा शेतकर्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. पहाटे स्थापन झालेले सरकार अयशस्वी झाल्यानंतर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळविता आले असते पण काँगे्रसने नेहमीप्रमाणेच लोकहित महत्वाचे मानले.
या कार्यक्रमात मनपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी शहरात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आ. प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद देण्याची आग्रही मागणी केली. पालकमंत्री भरणे यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी दिला नाही, महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादीकडून काँग्रेसला गिनले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.
कार्यक्रमात आ. प्रणिती शिंदे यांनी शहरात काँग्रेस वाढण्यासाठी व लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी एक खास मंत्री सोलापूरकरिता द्यावा अशी मागणी करीत मोदी सरकार काँग्रेसला संपवू शकत नाही, कारण काँग्रेस म्हणजे एक विचार आहे, असे प्रतिपादन केले. माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, धवलसिंह मोहिते-पाटील आदींची यावेळी भाषणे झाली. माजी खा. धर्मण्णा सादूल, सुरेश हसापुरे, विश्वनाथ चाकोते, दादा साठे, मीनल साठे आदी यावेळी उपस्थित होते.