Latest

नाना पटोले : ओबीसींबद्दलचा भाजपचा कळवळा हा फक्त देखावाच!

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भाजपला आलेला कळवळा हा निव्वळ देखावा आहे. या पक्षाचा डीएनए ओबीसी नसून, ओबीसीविरोधी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.

पटोले म्हणाले, देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे निर्माण झाला आहे. भाजपचे सरकार असताना 2017 मध्ये नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लीअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढले आणि जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या.

हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही न्यायालयात गेल्या. 2018 मध्ये उच्च न्यायालयाने आयोग स्थापन करण्याचे आदेश दिले. मात्र, फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही, त्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले, असा आरोप पटोले यांनी केला.

ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारने नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली. मध्य प्रदेशमध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा मात्र मोदी सरकारने त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्ष ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. दोन वर्षे काय केले, असा प्रश्न विचारत आहेत; मग फडणवीस सरकारने पाच वर्षे काय केले, त्यांनी आयोग का स्थापन केला नाही, असा सवालही पटोले यांनी भाजप नेत्यांना केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT