Latest

नागपंचमी विशेष : ‘नागभूमी’ शिराळा….

दिनेश चोरगे

शिराळा; विठ्ठल नलवडे :  कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनंतर प्रथमच शिराळा येथे मंगळवारी नागपंचमी बंधमुक्‍त वातावरणात, न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करत होत आहे. शिराळा शहरातील 60 नागराज मंडळांकडून नागपंचमी उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त..!

शहरातील साठ मंडळांनी प्रतिकात्मक नागपूजा व मिरवणुकीची तयारी पूर्ण केली आहे. नागपंचमीमुळे शिराळा गाव जगाच्या नकाशावर आले. देश-विदेशातील पर्यटक व प्रसारमाध्यमे यामुळे नागपंचमी जगभर पोहोचली. नागपंचमी निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी यामुळे विविध बंधनात साजरी करावी लागते. न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागपूजा व नागस्पर्धा बंद करण्यात आली आहे.

न्यायालयाने घालून दिलेल्या आदेशानुसार नागप्रतिमांचे पूजन व प्रतिकात्मक नागाची मिरवणूक काढण्यात येते. नागपंचमी उत्सवात धार्मिकता व संस्कृती आहे. मात्र अंधश्रद्धा नाही. शिराळा येथे सर्पदंशावरील उपचाराचा मोठा साठा असतो. नागपंचमीशिवाय जरी नाग दिसला तरी तो वनखात्याच्या देखरेखीखाली पकडून जंगलात सोडून देण्यात येतो. त्यास इजा होऊ नये याची काळजी घेतली जाते.

शिराळ्याच्या नागपंचमी उत्सवाला प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळात श्री गोरक्षनाथ देशाटन करताना शिराळा येथे आले. ते नाथसंप्रदायी होते. भ्रमंती करून उदरनिर्वाह करावयाचा असा एक दंडक होता. एका ठिकाणी तीन दिवसापेक्षा जास्त काळ रहावयाचे नाही. ते शिराळ्यात आले त्यावेळी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरणा व तोरणा नदीकाठी संगमावर वास्तव्यास होते. भिक्षा मागत महाजन यांच्या घरासमोर आले. माई भिक्षा वाढ, अशी आरोळी दिली. महाजन यांच्या घरातील गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. त्यामुळे भिक्षा वाढण्यासाठी वेळ झाला, असे त्या गृहिणींने सांगितले. गोरक्षनाथ यांनी तू जिवंत नागाची पूजा करशील का, असे विचारले असता तिने होकार दिला. गोरक्षनाथ यांनी आपल्या विद्येच्या जोरावर मातीच्या नागास जिवंत केले. यापासून तुला भय नाही, असे सांगितले तेव्हापासून येथे जिवंत नागाची पूजा सुरू झाली, अशी आख्यायिका आहे.

ही शेकडो वर्षांची परंपरा शिराळाकर जोपासत आहेत. नागपंचमी उत्सवाबाबत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात कागदपत्रे सापडली आहे. सन 1869 मध्ये नागपंचमीवर संशोधन झाले. तर 1848 मध्ये शिराळाहून नाग आणल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहे. शिराळा नागपंचमीला परंपरा व इतिहास आहे. आजही नागपंचमी दिवशी हजारो भक्‍त अंबामाता मंदिरात दर्शनासाठी येतात. बाहेर रहावयास असणारे शिराळकर उत्सवासाठी येतात. अंबामाता मंदिर व शिराळा शहरातील मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त असतो. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी गावात दाखल होत आहेत. नगरपंचायत प्रशासक मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी आरोग्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तहसीलदार गणेश शिंदे यांनी वारंवार नागमंडळे, पोलिस व वनखात्याच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे. अंबामाता मंदिरास अंबामाता ट्रस्टने विद्युत रोषणाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT