Latest

नाकातील दुखणे या विषयी जाणून घ्या

Arun Patil

नाकातील दुखणे हे नाकपुडीतील आणि नाकाच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील ज्याला 'सायनस' म्हणतात, त्यामधील दुखणे! साधारणपणे अ‍ॅलर्जिक र्‍हायनिटीस, सायनासायटीस, अ‍ॅन्ट्रीटीस, नाकांतील हाडाचे फ्रॅक्चर किंवा नाकपुडीत बाहेरून पदार्थ जाणे यामुळे दुखतेे, वेदना होतात.

अ‍ॅलर्जिक र्‍हायनिटीस :

परागकण, धूळ, हवामान बदल, अनावश्यक उगवलेली रानटी झुडपे इ.च्या अ‍ॅलर्जीमुळे नाकातील शेंबडासारख्या द्रवामध्ये होणारी जळजळ, चरचर म्हणजे अ‍ॅलर्जिक र्‍हायनिटीस. यामध्ये नाक खाजवणे, डोळे खाजवणे, नाक गच्च होणे, डोकेदुखी, नाकाचा वास कमी होणे, खोकला, कानाला दडे बसणे आणि कमालीचा थकवा, ही लक्षणे आढळतात. एकूण पूर्वेतिहास, दिसणारी लक्षणे आणि अ‍ॅलर्जी तपासणीचा एसिनोफिल काऊंट पाहिल्यावर यावर उपाय करता येतो.

सायनासायटीस : गालाच्या आतील बाजूतील आणि डोळ्यांच्या मागच्या, तसेच नाकपुडीच्या मागच्या पोकळीत जळजळ होणे, ठणकणे याला 'सायनासायटीस' म्हणतात. विशेष करून श्वासनलिकेतील संसर्ग आणि अ‍ॅलर्जीमुळे सायनासायटीसचा त्रास होतो. खास करून, डोक्यातील सायनस हे खास लक्षण असते.

ही डोक्यातील ठणठण सकाळी झोपून उठल्यावर, पुढे वाकल्यावर किंवा उष्ण वातावरणातून थंड वातावरणात गेल्यास वाढते. ही डोक्यातील ठणठण गाल, डोळे आणि कपाळावर एकवटली जाते. ताप, चोंदलेले नाक, पिवळा-हिरवा द्रव नाकातून गळणे ही सुद्धा साधारण लक्षणे असतात. यापूर्वीची माहिती, एक्स-रे फोटो, सीटी स्कॅन/एम. आर. आय. स्कॅन (चेहेर्‍याचा), नाकाची एन्डोस्कोपी यासारख्या उपाययोजनांनी याचे रोगनिदान होते.

अ‍ॅन्ट्रीटीस : अ‍ॅन्ट्रीटीस म्हणजे जबड्याच्या पोकळीतील जळजळ! ही बॅक्टेरिया, बाहेरील जंतूंचा संसर्ग, फंगल किंवा अ‍ॅलजीर्र्मुळे होते. दातांच्या वेगवेगळ्या त्रासांमुळे श्वासोच्छ्वासातील संसर्ग, नाकांतून रक्त येणे इ. लक्षणांनंतर पुढची पायरी म्हणजे अ‍ॅन्ट्रीटीस! अशावेळी नाक चोंदणे, सायनसचा त्रास, डोकेदुखी, दात दुखी, नाकातून पिवळट हिरवट द्रव येणे ही सर्वसाधारण लक्षणे दिसतात. शारीरिक तपासणी, सायनसेसचा एक्स-रे हे रोगनिदान करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

नाकाचे फ्रॅक्चर : नाकाचे फ्रॅक्चर म्हणजे चेहर्‍याचे सर्वसाधारण फ्रॅक्चर होय. नाकाचे हाड म्हणजे नाकाचा कार्टिलेजचा पूल. त्याचे फ्रॅक्चर सहसा मानेच्या जखमेसोबत होते. गांभीर्य पाहून, नाकातून वाहणारे रक्त वेळेवर थांबविण्यासाठी वैद्यकीय मदतीची गरज असते; अन्यथा अधिक मोठी जखम होणे, नाकाची क्रिया बंद होणे इ. गंभीर समस्या उद्भवू शकतात. याची लक्षणे नाकातून रक्त वाहने, नाकातील दुखणे, श्वास घेण्यात अडचणी आणि नाक वाकडे होणे. शारीरिक तपासणी, एक्स-रे, चेहर्‍याचा सीटी स्कॅन यावरून रोगनिदान होऊ शकते.

दमटपणा/ओलसरपणा/गंज काढून टाकण्याच्या रसायनामुळे होणारा विषारी संसर्ग : घरगुती साफसफाई करावयाच्या वेगवेगळ्या केमिकल्स/रसायनांचा वास घेतल्यामुळे किंवा ते पोटात गेल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामध्ये, हायड्रोजन पेरॉक्साईड, सोडियम पेर्बोरेट, सोडियम हायपोक्लोराईट अँड सोडियम पेरकार्बोनेट अशी रसायने असतात. त्यांचा शरीरातील वेगवेगळ्या यंत्रणांवर परिणाम होतो. याची सामान्य लक्षणे म्हणजे डोळ्यांत चुरचुरणे, नाक, ओठ, घसा यामध्ये जळजळणे, श्वास घेण्यास त्रास, उलटी होणे, पोटात दुखणे, बेशुद्ध होणे, रक्तदाब वाढणे, त्वचेवर पोळणे ही असून, त्यासाठी वैद्यकीय मदतीची तातडीची गरज असते.

नाकांत वाढणार्‍या लहान मृदू गाठी : दीर्घकाळच्या दम्यामुळे श्वासोच्छ्वासातील संसर्ग, अ‍ॅलर्जी, औषधे घेतल्याने होणार्‍या संवेदना यामुळे नाकांत मऊ, कर्करोग नसलेल्या छोट्या गाठी यांची वाढ होते व त्याठिकाणी जळजळ होते. याची लक्षणे म्हणजे चोंदलेले नाक, चव आणि वास न येेणे, घोरणे, चेहर्‍यावर दुखणे, डोकेदुखी आणि डोळ्यांत चुरचरणे. यासाठी नाकाची एन्डोस्कोपी, सीटी स्कॅन/एमआरआय इमेजिंग आणि शारीरिक तपासणी इ.नंतर योग्य रोगनिदान होऊ शकते. यासाठी स्टेरॉईडस् गोळ्या घेणे, इनहेलेशन-स्प्रे देणे हा पहिला उपचार ठरतो. त्यामुळे फरक पडत नसल्यास शस्त्रक्रिया करणे जरूरीचे आहे.

नाकाच्या आत वाढलेले हाडाचे टोक : नाकाच्या हाडाची वाढ होऊन बारीक टोके नाकाच्या आतील भिंतीतून पुढे आलेली असतात. या टोकांमुळे काहीवेळा तेथे वेदना होतात व त्या सहसा एकाच बाजूच्या असतात.

नाकपुडीतील गाठी आणि पॅरानेझल सायनस : याची लक्षणे म्हणजे नाक चोंदणे, नाकात अडथळा, नाकात दुखणे, कवठीवर, चेहर्‍यावर दुखणे, नाकातून रक्त येणे, चेहरा सुजणे, वास कमी येणे, द़ृष्टी कमी येणे, वजन कमी होणे, थकवा, चेहर्‍यावर, नाकावर किंवा तोंडाच्या आतल्या बाजूला गट्टू होणे इ. असतात. शारीरिक तपासणी, एक्सरेज, एन्डोस्कोपी, स्नायूच्या तुकड्याची बायोप्सी, सीसी स्कॅन/एमआरआय स्कॅन/ पेट स्कॅन, बोन स्कॅन इ. रोगनिदानासाठी उपयुक्त ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT