Latest

ना. अजित पवार म्हणाले, कोकण विकासासाठी भरघोस निधी देऊ

Arun Patil

चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : कोकणच्या विकासाला आघाडी सरकारकडून भरघोस निधी दिला जाईल. विकासाबरोबरच तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या कामांचे नियोजन सांगा. निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्‍वासन राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी खरवते-दहिवली येथील माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व मा. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी दिले.

या वेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खा. सुनील तटकरे, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, माजी आ. सुभाष बने, माजी आ. संजय कदम, मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉ. तानाजी चोरगे, माजी आ. रमेश कदम, शिवसेनेचे राजन महाडिक, प्राचार्य सुनितकुमार पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, पूजा निकम यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी होते.

यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आ. शेखर निकम यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर स्व. निकम यांच्या कठोर कष्टातून उभी राहिलेली संस्था त्यांच्यानंतर प्रगती करताना सर्वांचे पाठबळ सहकार्य मिळाले आहे, अशी भावना व्यक्‍त करून सह्याद्री परिवाराने जो आपणावर विश्‍वास टाकला व आपलेपणा जपण्याचे काम यापुढेही केले जाईल. मला राजकारणात काही नको. मात्र, दादांचे आशीर्वाद असावेत. राजकारणात आपल्याला काहीही न मागता दादा देतील, असा विश्‍वास आहे.

त्या नंतर आ. भास्कर जाधव म्हणाले, संस्थेची वाटचाल स्व. गोविंदराव निकम यांच्या कठोर कष्टातून झाली. आमचे राजकीय विचार त्यावेळी वेगळे होते. यापुढे मागचे विसरून आ. शेखर निकम यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्‍तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगितले. स्व. गोविंदराव निकम यांचा शैक्षणिक, सहकार चळवळीचा वारसा शेखर निकम समर्थपणे पेलत असल्याचे कौतुक करून व्यासपीठावरील आ. जाधव यांना राजकीय कोपरखळ्या देखील खा. सुनील तटकरे यांनी मारल्या.

उपमुख्यमंत्री ना. पवार म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणवर विशेष प्रेम होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही कोकणवर विशेष प्रेम आहे. स्व. निकम यांच्यासोबत खासदार म्हणून सहा महिने काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर कायमचा संपर्क सुरू राहिला. यातूनच त्यांच्या कठोर कर्तृत्व व कामाची जाणीव झाली.

कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील फळफळावळ व भौगोलिक परिस्थितीवर आधारित उद्योग निर्माण व्हावेत. त्यासाठी शेखरसरांनी पुढाकार घ्यावा. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करू. पर्यटनातून रोजगार, रस्ते व रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे. कोकणच्या विकासाला लागेल तेवढा निधी आघाडी सरकारच्या माध्यमातून दिला जाईल. त्यासाठी नियोजन व पाठपुरावा करा, असे आवाहन ना. अजित पवार यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT