Latest

नवे वर्ष निवडणुकांचे; 9 राज्यांमध्ये रंगणार विधानसभेची रणधुमाळी

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  नव्या वर्षात नऊ राज्यांत विधानसभा निवडणुका होत असून त्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तालीम मानल्या जात आहेत. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराम ही ती राज्ये आहेत. 2024ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची असून त्यांना सलग तिसर्‍यांदा सत्तेत येण्यासाठी दणदणीत यश हवे आहेत. दुसरीकडे 15 वर्षांच्या सत्ता उपवासानंतर विरोधकांना लोकसभा निवडणुकीत विजयाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत नव्या वर्षात होणार्‍या विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत.

राजस्थान : काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई

गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससाठी राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमधील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई असेल. राजस्थानात अशोक गेहलोत आणि सचिन पालयट यांच्यातील अंतर्गत मतभेद हे भाजपसाठी फायदेशीर ठरतील, असे मानले जाते.

मध्य प्रदेश : भाजपसमोर पुन्हा काँग्रेसचे आव्हान

मध्य प्रदेशात 2018 मध्ये ऑपरेशन लोटस राबवून भाजपने काँग्रेसची आलेली सत्ता हिसकावली होती. सत्तेचे टॉनिक मिळाल्याने पुन्हा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर काँग्रेसला वचपा काढण्याची खुमखुमी असल्याने ही लढाई एकतर्फी नसेल.

छत्तीसगड : काँग्रेससमोर आव्हान

छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे निकटवर्ती भूपेश बघेल मुख्यमंत्री आहेत. राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसला कडवी टक्कर द्यावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

कर्नाटक : भाजप 2018 ची पुनरावृत्ती टाळणार ?

2018 च्या उलथापालथील येडियुरप्पा यांना शपथ घेउनही बहुमत सिद्ध करण्ता आले नाही. म्हणून काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीने सरकार स्थापन केले. मात्र भाजपने येथेही 'ऑपरेशन लोटस' केले. आता भाजपला गड राखायचा आहे तर विरोधकांना सत्ता काबीज करायची आहे.

तेलंगणा : 'टीआरएस' – भाजप आमने-सामने

तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाने (टीआरएस) राज्य स्थापनेपासून सलग दोन निवडणुकीत सत्ता अबाधित ठेवली आहे. 'टीआरएस' प्रमुख के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. ते राष्ट्रीय पातळीवर भाजपविरुद्ध विरोधी पक्षांची एकजूट करत आहेत. आता 2023 च्या निवडणुकीत चंद्रशेखर राव यांच्यासमोर भाजपचे मोठे आव्हान असेल.

त्रिपुरा : भाजप पुन्हा मुसंडी मारणार?

ईशान्य भारतातील त्रिपुरामध्ये 2018 विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळवले होते. तब्बल 25 वर्षे भारतीय कम्युनिस्ट पार्टीची सत्ता भाजपने मोडीत काढली होती. बिप्लब कुमार देब यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. माणिक साहा यांनी 2016 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसचे भाजपसमोर आव्हान असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT