हुबळी ; पुढारी वृत्तसेवा : रशियाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चळगेरी (ता. राणेबेन्नूर) येथील नवीनच्या घरी स्मशानशांतता पसरली आहे. नवीनचे पार्थिव लवकरात लवकर आणण्याची मागणी पालकांनी केली आहे. पार्थिव आणण्यात अडचणी येत आहेत. (नवीन शेखरप्पा)
केंद्र सरकारकडून नवीनचा मृतदेह आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही राष्ट्रांच्या दूतावासाशी संपर्क केला जात आहे. नवीनचा भाऊ हरीश याने आपला लहान भाऊ नवीन याची अनेक स्वप्नं होती असे सांगितले. त्याच्याबरोबर गेलेली मुले परत येत आहेत. पण, त्यामध्ये आता नवीन नसल्याची खंत हरीश याने व्यक्त केली.
तो म्हणाला, 'मी घरामध्ये मोठा मुलगा आहे. बाबा आईचे सांत्वन करत आहेत. बाबांचे सांत्वन मी करत आहे. त्यांच्यासमोर मी रडलो तर संपूर्ण कुटुंबाला सावरणे कठीण बनेल.'
शेखरप्पा यांनी आपल्या देशात वैद्यकीय शिक्षण महाग असल्याने विद्यार्थी विदेशात जात असल्याचे सांगितले. देशात खासगी संस्थांमध्ये एमबीबीएससाठी कोटी रुपयांची गरज आहे. पण, युक्रेनसारख्या देशात शिक्षणाचा खर्च कमी येतो. नवीनला युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी नातवाईक आणि मित्रांनी आर्थिक मदत केली. काहीजणांकडून कर्ज घेतले.
तो प्रतिभावंत होता. पण, महागाईमुळे त्याला युक्रेनला पाठवावे लागल्याचे शेखरप्पा यांनी सांगितले. बारावीत त्याने 97 टक्के गुण घेतले होते. पण, बॉम्ब हल्ल्यात तो ठार झाल्याने त्याची स्वप्नही अपूर्णच राहिल्याचे भावोद्गार शेखरप्पा यांनी काढले.
नवीन ग्यानगौडरच्या निवासास्थानी अनेक मान्यवरांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. खारकोव्हमधील स्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
युक्रेनमध्ये असणार्या भारतीय दूतावासातील अधिकार्यांशी केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर, केंद्रीय विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्या सिंदिया, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संपर्कात आहेत.
शिक्षणानिमित्त युक्रेनला गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी दिल्लीहून बंगळूरला परतले. 27 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 64 जण सुरक्षितपणे आपल्या गावी परतले आहेत. युक्रेनहून दिल्ली तेथून मुंबईमार्गे कर्नाटकात त्यांना आणण्यात आले. नैसर्गिक आपत्ती निवारण प्राधिकरणाचे आयुक्त आणि नोडल अधिकारी मनोज राजन यांनी याबाबतची माहिती दिली.