ग्लासगो ; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची पहिल्यांदाच भेट झाली. इस्रायलमध्ये नवे सरकार निवडून आल्यानंतर दोन्ही देशांच्या नेत्यांची भेट झालेली नव्हती. बेनेट आणि मोदी यांच्यातील भेटीचा एक व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. बेनेट मोदींना म्हणतात, 'तुम्ही आमच्या देशात प्रचंड लोकप्रिय आहात. इस्रायलला या, माझ्या पक्षात सहभागी व्हा. निवडणूक लढवा. जिंकाल.'
इस्रायलचे याआधीचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि मोदी यांचे वैयक्तिक संबंध फार घनिष्ट होते. आता बेनेट पंतप्रधान आहेत. त्यांचा पक्ष टोकाच्या उजव्या विचारसरणीचा मानला जातो.
'टाइम्स ऑफ इस्रायल'ने मोदी आणि नफ्ताली बेनेट भेटीवर विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे. मोदी थांबलेल्या हॉटेलात बेनेट खास मोदींना भेटण्यासाठी आले होते. दोन्ही देशांची संस्कृती प्राचीन आहे आणि दोन्ही देशांतील लोकांचे परस्परांशी जुने आणि घनिष्ट संबंध आहेत, असेही या भेटीबाबतच्या वृत्तांतून नमूद करण्यात आले आहे.