काष्टी, वार्ताहर : श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर कोल्हापूर – गोंदिया हि महाराष्ट्र एक्सप्रेस मध्यरात्री क्रॉसिंगला थांबली असताना दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तीनी बोगीतील दोन डब्यावर दगडफेक करून, गाडीवर लटकून गाडीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे पोलिस संजय वामन पाचपुते, स्टेशन मास्तर रविंद्र पंडित,व गार्ड यांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्र एक्सप्रेस लुटीचा प्रयत्न फसला. घटने नंतर श्रीगोंदा पोलिसांनी पेट्रोलिंग केले पण कोणीही सापडले नाही.
सविस्तर माहिती अशी कि दि.२९ रोजी मध्यरात्री १२.२८ वाजता दौंड कडून नगर मनमाड कडे जाणारी कोल्हापूर गोंदिया हि महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे गाडी श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर क्रॉसिंगला १३ मिनिटे थांबली असता गाडीतील मागील दोन बोगीमध्ये (डब्यावर) अंधाराचा फायदा घेत दगडफेक सुरु करुन दहा ते पंधरा तरुण गाडीवर चढून लटकले. हेच दृश्य गाडीच्या मागे असणाऱ्या गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्टेशनमास्तर रविंद्र पंडित यांना माहिती दिली.
त्याचवेळी ड्युटिवर असणारे रेल्वे पोलिस संजय पाचपुते यांना माहिती मिळताच ते तातडीने गाडीतील शेवटच्या डब्याकडे धावले. परंतु पोलिस येत असल्याचे पाहून सर्व अज्ञात तरुणांनी गाडीवरुन उड्या मारून शेजारी असणाऱ्या शेतात अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. संजय पाचपुते यांनी श्रीगोंदा पोलिसांना सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरिक्षक समिर अंभग हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रेल्वे स्टेशन परिसर पिंजून काढला. त्यांना भाजपाचे जेष्ठ नेते नंदकुमार कोकाटे यांनी मदत केली. परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या घटनेची पोलिस दप्तरी मात्र नोंद नाही.
दौंड मनमाड हि सिंगल रेल्वे लाईन आहे. त्यामुळे एक्सप्रेस रेल्वे गाड्या स्टेशनवर थांबा नसताना सुध्दा डबल लाईन नसल्यामुळे समोरून आलेल्या गाडीला जाण्यासाठी कोणत्यातरी एका गाडीला क्रॉसिंग करुन थांबा द्यावा लागतो. त्याचवेळी रेल्वे गाडीवर रात्रीचा हल्ला करुन प्रवाशाची लुट केली जाते. स्टेशनवर सुरक्षेसाठी फक्त एक पोलिस देऊन उपयोग नाही; तर आणखी पोलिस सुरक्षा असावी अशी मागणी नंदकुमार कोकाटे यांनी केली आहे.