Latest

धरणग्रस्तांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’

Shambhuraj Pachindre

कुडाळ : प्रसन्न पवार

पुनर्वसनाचे प्रश्‍न अद्यापही प्रलंबीत असल्याने महू -हातगेघर धरणग्रस्तांची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे. पुनर्वसन रखडल्याने या शेतकर्‍यांचे हाल सुरु आहेत. महू-हातगेघर धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. काही दिवसापूर्वी एका धरणग्रस्त शेतकर्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर धरणावर आंदोलन करून सरकारचे लक्ष याकडे वेधले होते.तरीसुद्धा प्रश्न सुटले नाहीत म्हणून शेतकरी संघटनेने खंडाळा येथे आंदोलन केले होते. यावेळी अधिकार्‍यांनी आठ दिवसात सर्व प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन महू- हातगेघर वासियांना दिले.

पुनर्वसनावेळी शासनाने शेतकर्‍यांना कब्जा पट्टी दिलेली आहे.खंडाळा भूमिअभिलेख ती कब्जापट्टी ग्राह्य न धरता, पुनर्वसन खात्याकडून संपादित केलेल्या जमिनीचे नकाशे न मागवता व खातरजमा न करता नवीन नकाशे बनवून शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. अशिक्षित शेतकर्‍यांचा गैरफायदा घेऊन त्यांना योग्य ती उत्तरे दिली जात नाहीत.शासनाने धरणग्रस्त शेतकर्‍यांना 2008 मध्ये जमिनी दिल्या आहेत. परंतु, त्या जमिनीला रस्ता, पाणी अजूनही मिळालेले नाही. तेथे एमआयडीसी झाल्यामुळे दलालांचा पुनर्वसीत शेतकर्‍यांच्या जमिनीवर डोळा आहे. अनेक जमिनींचे नकाशेच बदलले आहेत. शेतकर्‍यांना दलालांकडून दमबाजी केली जाते, पिस्तूल दाखवले जाते. शेवटी वैतागून दलाल व प्रशासकीय अधिकारी कवडीमोल भावाने शेतकर्‍यांना जमिनी विकण्यास भाग पाडत आहेत.

धरणग्रस्तांचे पुनर्वसन खंडाळा व फलटण तालुक्यात झाले आहे. खंडाळा तालुक्यातील गावांमध्ये अनेकांना गावठाण मिळालेले आहे. काहींची घरे धरणाच्या पाण्यामध्ये गेल्यामुळे गावातील अनेक शेतकर्‍यांना पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची वेळ आली आहे.गावठाणातील जवळजवळ वीस प्लॉट गावठाण सोडून खाजगी शेतकर्‍यांच्या ताब्यात गेले आहेत. त्यात काही शेतकर्‍यांनी घरे बांधली. खाजगी मालक घरे तोडण्याची, हाकलून देण्याची धमकी देत आहेत, अशी माहिती धरणग्रस्तांनी दिली.

महू-हातगेघर येथील गेली पंचवीस वर्षे प्रशासकीय अधिकारी आणि खरेदी विक्री करणारे दलाल यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकर्‍यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख कमलाकर भोसले यांनी दिला

प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र टेबल

या सर्व बाबी जिल्हा भुमिअभिलेख अधिकार्‍यांना सांगितल्यावर भुमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षक राज यांनी भूमी अभिलेख कार्यालयात धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी टेबल बसवण्याचा निर्णय घेतला आहे.आठ दिवसात पुनर्वसन खात्याकडून संपादित नकाशे घेऊन तसेच शेतकर्‍यांच्या कब्जा पट्ट्या घेऊन फाळणी नकाशे बनवून गावठाण विस्तार प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू, असे आश्वासन त्यांनी कमलाकर भोसले यांना दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT