Latest

धनत्रयोदशीला सोने झळाळून निघणार!

Arun Patil

मुंबई : चेतन ननावरे : दसर्‍याला साडेचारशे कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल करणार्‍या सराफा बाजाराच्या दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. धनत्रयोदशीला सराफा बाजारात तब्बल 700 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा सराफा संघटनेने वर्तवली आहे.

मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, दरवर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. साधारणतः 200 ते 250 कोटी रुपयांची उलाढाल करणार्‍या सराफा बाजारात यावेळी दसर्‍याला सराफा बाजाराने 300 ते 350 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल अपेक्षित केलेली होती.

मात्र गेल्या दीड वर्षांपासून खरेदीसाठी थांबलेल्या ग्राहकांनी तुफान प्रतिसाद नोंदवत दसर्‍याच्या मुहूर्तावर तब्बल 450 कोटी रुपयांचे सोने लुटले. याआधी सराफा बाजारात दसर्‍याला होणार्‍या सोने खरेदीहून सुमारे 30 ते 40 टक्के अधिक खरेदी धनत्रयोदशीला नोंदवली जाते. त्यामुळे दसर्‍याच्या अनुषंगाने धनत्रयोदशीला 700 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

2018 मध्ये धनत्रयोदशीला सोन्याचे दर प्रतितोळा 31 हजार 784 रुपये होते. रविवारी सोन्याचे दर प्रतितोळा 49 हजार 350 रुपये होते. यापुढे सोने दरात वाढ होण्याचा अंदाज सराफा व्यक्त करत आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीला सोने पुन्हा एकदा 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

म्हणून रविवारीही बाजार खुला!

सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने एरव्ही रविवारी बंद असणारा झवेरी बाजार यंदा रविवारी खुला असल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी उसळलेली गर्दी पाहून रविवारी दुकान सुरू ठेवल्याचे सराफा जिनेश झवेरी यांनी सांगितले. ग्राहकांनीही रविवारी तुरळक प्रमाणात गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT