लिमा : अमेरिकन खंडांमधील सर्वात जुनी ऑब्झर्व्हेटरी किंवा वेधशाळा 'चांकिल्लो'ला आता युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे. 2300 वर्षांपूर्वीची ही वेधशाळा एका डोंगरावर दगडांपासून बनवलेल्या तेरा मनोर्यांनी तयार केलेली आहे. एकेकाळी तिचा वापर घड्याळ किंवा कॅलेंडर म्हणूनही होत होता.
पेरू देशातील 'इन्का' संस्कृतीमधील लोकांनी दोन हजार वर्षांपूर्वी या वेधशाळेची निर्मिती केली होती. इसवी सनापूर्वी 250 ते 200 या काळात ही वेधशाळा बांधून पूर्ण झाली. तिच्या सहाय्याने प्राचीन इन्का लोक अचूकपणे खगोलीय गणना करू शकत होते. या स्थळाचा वापर मंदिर आणि प्रशासकीय कार्यालय म्हणूनही होत होता. सूर्याच्या भ—मणावरून अयनांत आणि विषुव यांच्याविषयीचे अनुमान काढले जात असत. 'सायन्स फोकस' मासिकामध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. वेधशाळेतून मिळालेल्या माहितीचा वापर प्राचीन इन्का लोक पिकांच्या कापणीपासून ते धार्मिक उत्सवांच्या नियोजनापर्यंत अनेक गोष्टींसाठी करीत असत. याठिकाणी सूर्यपूजाही होत असे.