Latest

दै.‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन : उद्योजकतेसोबत पर्यटनाचे धारकरी बना : माळी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पर्यटन हे आजच्या आधुनिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड, उत्तम संवादकौशल्य, एकाहून अधिक भाषांवर प्रभुत्व, भौगोलिक प्रदेशांची जाण तसेच सहकार्य वृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असावे लागते. उद्योगजकतेसोबत पर्यटन क्षेत्राचे धारकरी बना, असे आवाहन कृष्णराव माळी यांनी केले. सायबर महाविद्यालयात दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन आणि सायबर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. 'पर्यटन व्यवस्थापन आणि नोकरीची संधी' विषयावर परिसंवाद घेण्यात आला.

दळण-वळणाच्या सुविधा वाढल्याने देश-परदेशगमन करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या क्षेत्राकडे करिअरपेक्षाही आवड म्हणून पाहिल्यास हमखास यश मिळेल, असे अमित चौकले म्हणाले. तर परदेशी पर्यटक भारतात येतात, त्याचप्रमाणे भारतीय पर्यटकही विविध देशांना भेटी देतात. निसर्गसौंदर्य न्याहाळतानाच तेथील नवनवीन कला, संस्कृती याविषयी जाणून घेण्यासाठी नवनव्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथे भेटी देण्याची माणसाची मूलभूत प्रवृत्ती हाच पर्यटनाचा मूळ आधार असल्याचे सूरज नाईक यांनी सांगितले.

जैवविविधतेने नटलेला पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री. उन्ह्याळ्यातही हिरवाई टिकवणारा पट्टा, असे या घाटाचे वैशिष्ट्य आहे. अलीकडे इको म्हणजे पर्यावरण टुरिझमची क्रेझ वाढत असून, या क्षेत्रात अनेक करिअर संधी असल्याचे सहायक वनसंरक्षक सुनील निकम यांनी सांगितले. विभागप्रमुख डॉ. दीपक भोसले यांनी प्रास्ताविक केले. शर्वरी काटकर यांनी आभार मानले. यावेळी वनविभागाचे एन. एस. कांबळे, आर. एस. कांबळे, गुरुनाथ कुलकर्णी, डॉ. सोनिया राजपूत, डॉ. सुरेश आपटे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT