Latest

देशातील पहिले गोल्ड एटीएम हैदराबाद शहरात

Arun Patil

हैदराबाद, वृत्तसंस्था : सोने खरेदी करण्यासाठी सोनारांच्या पेढीवर जाण्याऐवजी एटीएमच्या माध्यमातून सोने खरेदी करता येणार आहे. हैदराबादेतील बेगमपेठ येथे एका कंपनीने देशातले पहिले 'गोल्ड एटीएम' सुरू केले असून पहिल्याच दिवशी 20 ग्राहकांनी सोने खरेदी केले. या एटीएममधून अर्धा ग्रॅम ते 100 ग्रॅम अशी एकूण आठ प्रकारची सोन्याची नाणी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

हैदराबादच्या एका कंपनीने स्टार्ट अप म्हणून सुवर्ण एटीएमचा प्रयोग केला आहे. आतापर्यंत जगात दुबईमध्येच सोन्याच्या खरेदीसाठी एटीएम सुरू झाले आहेत. भारतातले पहिले आणि जगातले पहिले रिअल टाईम सुवर्ण एटीएम हैदराबादेत सुरू झाले आहे.

पैसे काढता येणारे एटीएम बघण्याची सवय झालेल्या सोनेप्रेमी भारतीयांना आता थेट एटीएममधून सोने काढता येणार आहे. हैदराबादमध्ये देशातील पहिले सुवर्ण एटीएम सुरू झाले आहे. फक्त कार्ड टाकायचे आणि हव्या त्या वजनाची सोन्याची नाणी काढायची. लंडन सोने बाजाराशी जोडलेल्या या एटीएमवर तत्काळ सोन्याच्या दरातील बदल उपलब्ध होणार आहेत.

सध्या एकच एटीएम सुरू झाले असले, तरी आगामी काळात हैदराबादेत आणखी 4 आणि तेलंगणाच्या ग्रामीण भागात किमान 50 सुवर्ण एटीएम सुरू होणार आहेत. नंतरच्या टप्प्यात देशात 3000 एटीएम सुरू होतील.

कडेकोट सुरक्षा…

पैशाच्या एटीएमसाठी सुरक्षा व्यवस्था असतेच. पण आता सोने असलेल्या एटीएमसाठी अत्याधुुनिक यंत्रणा वापरण्यात आली आहे. या एटीएम यंत्रातच कॅमेरा बसवलेला आहे. त्याशिवाय बूथमध्ये आणखी दोन कॅमेरे ग्राहकाच्या हालचालींवर नजर ठेवतील. तसेच एटीएमच्या बाहेर तीन कॅमेरे असतील. एटीएम फोडायचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजून बूथ लॉक होणार असून पोलिस ठाण्यांची तत्काळ मदत उपलब्ध होईल.

* एटीएमची क्षमता 5 किलो
* नाण्यांच्या रूपात मिळणार 24 कॅरेट सोने
* अर्धा ग्रॅम ते 100 ग्रॅम अशा आठ प्रकारांत मिळणार सुवर्ण नाणी
* क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे करता येणार व्यवहार
* प्रिपेड कार्डचीही योजना लवकरच
* सोन्याचे ताजे दर पडद्यावर झळकणार
* पहिल्या दिवशी आले 20 ग्राहक

सुवर्णप्रेमी भारत

* 2021 मध्ये सोन्याची मागणी 797 टन
* 2022 मध्ये सोन्याची मागणी 850 टन
* 80 टक्के वाटा दागिन्यांचा 20 टक्के वाटा सोन्याची
* बिस्किटे व नाण्यांचा तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडूत सर्वाधिक मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT