Latest

देशात आजही कोरोना संसर्गात ‘डेल्टा’ विषाणूचाच वरचष्मा!

Arun Patil

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : देशात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणू रुपाने काहीशी दहशत बसविण्यास सुरुवात केली असली, तरी अद्याप भारतातील कोरोना संसर्गामध्ये 'डेल्टा व्हेरिएंट'चेच प्राबल्य मोठे आहे. या व्हेरिएंटविरुद्ध सध्या वापरात असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी परिणामकारक आहेत. या लसींनी कोरोनाची गंभीर स्थिती होण्यापासून सुरक्षा उपलब्ध केल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनाचे प्रतिबंधक उपाय यापुढेही कायम चालू ठेवले पाहिजेत, असा सल्ला भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने दिला आहे.

भारतात नोव्हेंबरच्या उत्तरार्धात आढळून आलेल्या ओमायक्रॉन या कोरोना विषाणू रुपाने रुग्णशंभरी ओलांडली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचे अतिरिक्‍त महासंचालक डॉ. सिमरन पांडा यांनी याविषयी स्पष्टीकरण देताना ओमायक्रॉनमुळे चिंताग्रस्त होण्याचे कारण नसल्याचा निर्वाळा देतानाच ही साथ पसरली, तरी आरोग्य व्यवस्थेवर फार मोठा ताण निर्माण होणार नाही, अशी आशा व्यक्‍त केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात आढळलेल्या ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्णांपैकी अधिकत्तम रुग्णांची पार्श्‍वभूमी परकीय प्रवासाची आहे. अथवा बाहेरून प्रवास करून आलेल्या प्रवाशांच्या सान्‍निध्याची आहे. ही संख्या वाढताना दिसत असली, तरी संख्येचे आकारमान हे देशात दैनंदिन बाधित होणार्‍या कोरोना रुग्णांच्या प्रमाणात खूपच कमी आहे. या संसर्गामध्ये डेल्टा विषाणूमुळे बाधित होणारे रुग्ण आजही मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

विषाणूने आपले रुप बदलणे ही क्रिया संसर्गाच्या प्रक्रियेत सतत होत असते. नवे रुप जन्म घेताना जुन्या रुपाचा भार हळूहळू कमी होतो आणि संसर्गाची जागा नवे रुप घेत असते. भारतात कोरोनाचे ओमायक्रॉन विषाणू रुप आढळल्यानंतर डेल्टा विषाणूंचा प्रभाव कमी होऊन त्याची जागा ओमायक्रॉन घेईल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत होता.

तथापि, आजही डेल्टा संसर्गाचा प्रभाव कायम आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोेधन संस्थेने ओमायक्रॉन रुग्णसंख्येने शंभरीचा टप्पा ओलांडल्यानंतर जनतेला उपाययोजनांवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग मोठा आहे.

दीड ते तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होते आहे. याचा वेध घेतला तर, कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालन करणे, प्रवास टाळणे, गर्दींपासून दूर राहणे, मोठे सभा-समारंभ बंद करणे आदी गोष्टी कटाक्षाने पाळण्याची गरज असल्याचे नमूद करताना संसर्ग लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेनेही सज्ज राहिले पाहिजे, असेही म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT