नृसिंहवाडी : विनोद पुजारी 'सैनिकांचे गाव' म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशसेवेचे व—त अंगीकारले आहे. येत्या 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त अनेक वर्षे देशाच्या रक्षणासाठी हजारो जवान बहाल करणार्या सैनिक टाकळीची प्रेरणादायी यशोगाथा आजपासून…
तिन्ही बाजूंनी कृष्णामाईच्या विस्तीर्ण जलप्रवाहाने व्यापलेले सैनिक टाकळी गाव! गावाला जाग येते ती तरुणांच्या रपेटीने. येथील चार-चार पिढ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेले आहे. म्हणूनच या गावाला 'सैनिक टाकळी' नावाने ओळखले जाते. ही बिरुदावली गाव केवळ अभिमानाने मिरवते असे नाही तर त्या बिरुदावलीला आजही सार्थकता प्राप्त झाली आहे. गावची लोकसंख्या जवळपास 6500 आहे. गावकर्यांची बागायती शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे आर्थिक स्थैर्य असूनही येथील तरुण सैन्यात भरती होण्यासाठी आसुसलेला असतो. गावातील निवृत्त जवान हे या तरुणांचे प्रेरणास्रोत आहेत. सैनिक टाकळी या गावच्या नावामागे सुद्धा एक रंजक गोष्ट आहे. शिरोळचे तत्कालीन आमदार देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पंचगंगा
साखर कारखान्यासाठी उभारलेल्या इरिगेशन स्किमच्या उद्घाटनासाठी 1968 मध्ये जनरल पी. पी. कुमारमंगलम आले होते. तेव्हा कुमारमंगलम यांच्या टाकळी भेटीचे नियोजनही केले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी सर्व निवृत्त जवान लष्करी गणवेशात उपस्थित होते. एवढ्या मोठ्या संख्येने आलेले हे निवृत्त जवान कुठून आले, असे त्यांनी विचारले. तेव्हा ते याच गावचे असल्याचे कळल्यानंतर कुमारमंगलम यांनी कौतुकाने 'अरे ये टाकळी नहीं, ये तो सैनिक टाकळी हैं!' असे गौरवोद्गार काढले. त्या दिवसापासून गावाला सैनिक टाकळी नावाने ओळखले जाऊ लागले.
सुमारे एक ते दीड हजार कुटुंबे असणार्या या गावात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीने सैन्यात काम केल्याचे सांगितले जाते. सध्या 350 जवान हे देशाच्या विविध भागांत भारतीय सैन्यासाठी सेवा देत आहेत. तब्बल 1100 जवान सेवेतून निवृत्त झाले आहेत. आज भारतातील असे एकही लष्करी ठाणे नाही की, जिथे या गावातील जवानाने सेवा बजावलेली नाही, असे अभिमानाने येथील निवृत्त जवान सांगतात. पहिले आणि दुसरे महायुद्ध इथपासून ते भारत-चीन, भारत-पाकिस्तान या युद्धांमध्ये सैनिक टाकळी गावातून 18 बहाद्दर सुपुत्रांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. अद्वितीय साहस आणि पराक्रमाचा वारसा सांगणार्या या गावाने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शत्रूच्या हृदयात धडकी भरवणारा सैनिक टाकळीचा जवान हा देशाच्या प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे.
1978 साली गावात सैनिक समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. गावातील सर्व निवृत्त जवान हे आमचे भूषण आहेत. या माजी सैनिकांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणे व तरुण पिढीला सैन्यात भरती होण्यासाठी आम्ही प्रेरित करतो. गावात शहीद जवानांचे स्मरण म्हणून अमर जवान स्मारक उभारले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आमचे मंडळ कटिबद्ध आहे.
– निवृत्त लेफ्टनंट बी. एस. पाटील
(अध्यक्ष, सैनिक समाजकल्याण मंडळ)
– निवृत्त हवालदार ए. डी. पाटील
(कार्याध्यक्ष, सैनिक समाजकल्याण मंडळ)