मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओबॉम्ब टाकून राज्य सरकारवर केलेले आरोप विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी शनिवारी फेटाळून लावले. व्हिडीओतील प्रत्यक्ष चित्रण आणि ऐकवला जाणारा आवाज दोन्ही वेगवेगळे असल्याचा दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व मूळ रेकॉर्डिंग समोर आणण्याची गरज आहे, असे सांगून अॅड. चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे चित्रीकरण करणारा सूत्रधारही उघड केला. ते म्हणाले, तेजस मोरे नावाचा एक आरोपी तुरुंगात होता. त्यापूर्वी जामिनासाठी तो माझ्याकडे येत असे. मूळचा जळगावचा असलेला मोरे यानेच हे स्टिंग ऑपरेशन केले.
समोरच्या काचेच्या भिंतीवर लावण्यासाठी घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला. मात्र हे रेकॉर्डिंग मॅनीप्युलेट करण्यात आले. व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत. म्हणजे चित्रीकरणातील माणसे खरी आणि ऐकवले जाणारे संवाद मात्र खोटे आहेत. अनेक वाक्ये अर्धवट वापरण्यात आली. मी चालवत असलेल्या केसमध्ये जे आरोपी तुरुंगात आहेत त्यांचीही या मोरेला साथ आहे, असा आरोप करून अॅड. चव्हाण म्हणाले, मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनची चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.
* तेजस मोरे जळगावच्या जिल्हा परिषद कॉलनीत राहात होता. मात्र, दहा-बारा वर्षांपासून तो पुण्यात राहतो. रावसाहेब रूपचंद विद्यालयात माध्यमिक, तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्यात घेतले. त्याची आई जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात अध्यापक, तर वडील जिल्हा परिषदेत अभियंता होते. दोघेही आता निवृत्त झाले आहेत. तेजस पुण्यात बांधकाम व्यवसायात असताना, स्टेट बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला सहा महिन्यांचा कारावासही झाला होता. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटकही झाली होती. तो सणावाराला दोन-तीन दिवसांसाठी जळगावात येतो. ना. फडणीस यांनी या व्हिडीओचा पेनड्राइव्ह सादर केल्यापासून तेजसचे वडील रवींद्र मोरे घराला कुलूप लावून गावी गेले आहेत. त्यांचा मोबाईल बंद आहे, असे त्यांचे शेजारी बाळासाहेब परखड यांनी सांगितले.
* स्टिंग ऑपरेशनचे जळगाव कनेक्शन
* व्हिडीओ एक आणि संवाद वेगळे
* वाक्ये अर्धवट वापरण्यात आली
* भेट दिलेल्या घड्याळात कॅमेरा बसवून चित्रीकरण केल्याचाही चव्हाण यांचा आरोप