पुणे ; पुढारी वृत्तसेवा : हिंदुत्व ही संकल्पना संकुचित नाही. ती भारतीय संस्कृतीशी जोडलेली संकल्पना आहे. मात्र, अनेक पक्षांना हिंदुत्वासाठी शाल पांघरावी लागत आहे. आम्हाला मात्र शाल पांघरण्याची गरज नाही. कारण आमच्या रक्तात हिंदुत्व आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली. 'मी कोणाच्या शालीसंदर्भात बोलत आहे, त्यांना ते समजले असेल', असा टोलाही त्यांनी लगावला.
मल्हार पांडे अनुवादित आणि काँटिनेंटल प्रकाशित 'भाजप : काल, आज आणि उद्या' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, पुस्तकाचे मूळ लेखक नोबेल पुरस्कार विजेते शांतनू गुप्ता, भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. राम सातपुते, प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगाला विचार देणारी भारतीय संस्कृती आहे. जगातील पहिल्या पुस्तकाच्या पाच हजार वर्षांपूर्वी ऋग्वेद लिहिले गेले. आम्ही विचार देणारे आहोत. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि विचार नष्ट होऊ नयेत, म्हणून डॉ. केशवराव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. भाजपचा विचार अजरामर असून हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम 'भाजप : काल, आज आणि उद्या' हे पुस्तक करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था भरारी घेत आहे. भारतात जन्म व भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळणे, हे दोन्ही अभिमानास्पद आहे.
चंद्रकांत पाटील यांचा पवारांसह शिवसेनेला टोला
भारतीय लोकशाही कोणालाही पळवून लावू शकते, हे माढा लोकसभा मतदारसंघाने आणि खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी दाखवून दिले. कोणाला पळवून लावले, हे मी सांगणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच ज्या पक्षाचा 1988 ला पहिला आमदार झाला, त्या पक्षाला असे वाटते की, भाजपला आम्ही गावोगावी पोहोचवले. आमची वाटचाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मापासून सुरू आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.