नांदेड ; पुढारी वृत्तसेवा : देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे मंगळवारी 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. पक्षाने ही जागा राखली. भाजपचे उमेदवार व तीनवेळा आमदार राहिलेले सुभाष साबणे पराभूत झाले.
जितेश अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 840 मते मिळाली. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 907, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांना 11 हजार 348 मते मिळाली.संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले होते.
मंगळवारी सकाळी देगलूर येथे मतमोजणी सुरू झाल्यानंतर टपाली मतांच्या मोजणीपासूनच साबणे पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. ही पिछाडी शेवटच्या 30 व्या फेरीच्या मोजणीपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपला जिल्ह्यातील प्रभाव दाखवून दिला. वंचित आघाडीसह इतर उमेदवारांची धूळधाण उडाली.
भाजपचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर व त्यांच्या चमूला या भागातील जनतेने मोठा तडाखा दिला आहे. साबणे यांची उमेदवारी चिखलीकर यांनी लादली म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्ष सोडून काँग्रेसमध्ये म्हणजे स्वगृही प्रवेश केला होता. त्याचा या पक्षाला मोठा लाभ झाला.
2009 मध्ये नव्याने निर्माण झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघात जितेश यांनी मताधिक्याच्या बाबतीत विक्रमाची नोंद करत वडिलांच्या जागी विधानसभेमध्ये प्रवेश मिळवला आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे.
काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर हे 23 हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांनी त्यांच्या दुप्पट मताधिक्य मिळविले आहे.