नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मोबाईलवर डेटा वा इंटरनेटशिवाय दूरदर्शन प्रसारण सुरू करण्यासाठी 'प्रसार भारती'ने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी 'डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्ट'ची तांत्रिक रूपरेखा तयार करण्याची जबाबदारी कानपूर आयआयटीला सोपविण्यात आली आहे.
मोबाईलवर दूरदर्शन चॅनेल्स विना डेटा आणि इंटरनेट सुरू झाले तर भारत असे करणारा जगाच्या पाठीवरील तिसरा देश ठरणार आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोनच देशांतून सध्या असे घडत आहे. युरोपातही प्रयत्न सुरू आहेत.
मोबाईल फोनवर व्हिडीओ कन्टेंट बघण्याचे चलन समाजात वाढलेले आहे, ते बघता 'डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्ट'ची गरज लक्षात घेतली गेली आहे. '5-जी मोबाईल टेक्नॉलॉजी' आल्यानंतर मोबाईलवर व्हिडीओ बघण्याच्या प्रमाणात आणखी वाढ होणार, हे ठरलेले आहे.
…तरी प्रसारण सुरूच राहील
'डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्ट सिग्नल'च्या माध्यमातून लाईव्ह दूरदर्शन प्रसारण या तंत्राद्वारे पोहोचणार असल्याने ढगाळ वातावरण, जोरदार पाऊस अशा विपरीत परिस्थितीतही प्रसारण बंद होणार नाही.
सर्व रिले केंद्रे बंद होणार
प्रसार भारतीने अप्रासंगिक ठरलेली दूरदर्शनची सर्व 1 हजार 300 रिले केंद्रे बंद करण्याचे ठरवले आहे. दूरदर्शन आधुनिकीकरण योजनेंतर्गत 900 रिले केंद्रे आधीच बंद झाली आहेत. उर्वरित 400 केंद्रे पुढील वर्षात मार्चपर्यंत बंद होतील.
राष्ट्राच्या द़ृष्टीने महत्त्वाचे विषय आणि धोरणांतून आवश्यक असलेले संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे नवे व्यासपीठ मोलाचे ठरेल. ते लवकरात लवकर सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
– शशी शेखर, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रसार भारती