मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हाधिकार्यांपाठोपाठ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हेल्मेटसक्तीविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सर्व प्रश्नचिन्हांना पूर्णविराम देत हेल्मेटसक्ती कायद्यात असून त्याला कोणताही पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
हेल्मेटचा वापर वाढावा म्हणून शासकीय कार्यालयांपासून कारवाई सुरु करण्याचे आदेश दिल्याचेही आयुक्तांनी दैनिक पुढारीला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले. शासकीय कर्मचार्यांकडे व पोलिसांकडे बोट दाखवत सर्वसामान्य चालक हेल्मेट वापरण्यास नकार देत आहेत. मात्र ही पद्धत चुकीची आहे.
त्यामुळे शासकीय कार्यालयांबाहेर गस्ती पथकांना विनाहेल्मेटची कारवाई तीव्र करण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने हेल्मेट सक्तीचा नियम रद्द केलेला नाही. परिणामी, राज्यात कुठेही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवता येणार नाही. तसा प्रयत्नही चालकांनी करू नये. कारण रस्ते सुरक्षा समितीच्या माहितीनुसार, दुचाकींचे सर्वाधिक अपघात हे अंतर्गत रस्त्यांवर झाले आहेत.
तसेच हेल्मेट परिधान केल्यामुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटल्याचे वारंवार समोर आले आहे. म्हणूनच राज्यात अंतर्गत रस्त्यांवर हेल्मेट वापरण्याची गरज नाही असे आदेश देण्याचे विशेषाधिकार कुणालाही नाहीत. देशात हेल्मेटसक्ती चा कायदा आहे. कायद्याहून कुणीही मोठे नाही. त्यामुळे प्रत्येकाने या नियमाचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.