दहावी आणि बारावी च्या निकालांपासून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेली 'री'च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहण्याऐवजी नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचे नवे मॉडेल निर्माण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोरोनासारख्या आपत्तीमुळे गेली दीड वर्षे संपूर्ण सामाजिक प्रक्रियाच उद्ध्वस्त झालेली आहे. कोरोनाच्या महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर जसा झाला आहे त्यापेक्षा थोडा अधिक शिक्षणाच्या प्रक्रियेवर झाला आहे. शैक्षणिक प्रक्रियेशी संपूर्ण देशाच्या विकासाची प्रक्रिया जोडली गेलेली असते. त्यामुळे त्याबाबत आपल्याला विशेष गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाचा परिणाम गरीब-श्रीमंत, सशक्त-अशक्त, सुशिक्षित- अशिक्षित अशा सर्वच स्तरांवर, सर्व वयोगटावर सर्व क्षेत्रांवर झालेला दिसून येत आहे.
प्रत्येकाच्या मनावर एक प्रकारची दहशत, भीती, अस्थिरता, निराशा, नकारात्मकता या सर्वांची पकड घट्ट होत असतानासुद्धा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये भगीरथ प्रयत्न करून दहावी आणि बारावी निकाल चे शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून लावलेले आहेत. विद्यार्थ्यांनी जे काही कमी-जास्त प्रयत्न केलेले असतील किंवा आहेत त्याला समाजाने दाद दिलीच पाहिजे, कौतुक केलेच पाहिजे. असे अपेक्षित असताना समाजातील प्रत्येक व्यक्ती या मुलांना नकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत आहे. वास्तविक, ही समाजाची फार मोठी चूक आहे.
विद्यार्थ्यांचा निकाल हा संकलित नोंदपत्रिका, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, काही प्रमाणामध्ये संकलित मूल्यमापन या शिक्षणाला मान्य असलेल्या शैक्षणिक प्रक्रियेतून लागलेला आहे. या प्रत्येक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रयत्न, अभ्यास, कष्ट, जिद्द या सर्व गोष्टी सामावलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी निश्चितपणे कौतुकास पात्र आहेत. जे यश त्यांना मिळालेले आहे ते अनावधानाने मिळालेले नाही. त्याला निश्चित काही तरी अर्थ आहे, महत्त्व आहे आणि आधारही आहे. या निकालावर त्यांची पुढील कारकीर्द अवलंबून आहे. किंबहुना विद्यार्थ्यांची मानसिकताही त्यावर अवलंबून आहे याचा विचार करून आपण सर्वांनी या विद्यार्थ्यांचे प्रथमतः अभिनंदन करूयात, कौतुक करूयात !
यश मोठ्या प्रमाणात आहे, यशाची गुणवत्ता ही भव्य आहे. कदाचित ही गोष्ट भविष्यकाळामध्ये समाजाची गुणवत्ताही उंचावेल, असा अंदाज बांधण्यास किंवा अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नसावी. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये काय झाले याचा विचार न करता भविष्यकाळामध्ये काय घडणार आहे, याबाबत चिंतन आणि विचारमंथन करणे गरजेचे आहे. आपल्याला जे काही यश मिळालेले आहे त्यामुळे हुरळून जाणे विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या द़ृष्टिकोनातून योग्य नाही.
मिळालेल्या यशात सातत्य टिकवणे हे फार मोठे आव्हान प्रत्येकापुढे असते. तसे ते विद्यार्थ्यांपुढे आहे, विद्यार्थ्यांचा साकल्याने विचार करणार्या पालकांपुढे आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या अध्यापकांपुढे आहे; त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांबरोबर समाजाचा विचार करणार्या शासनापुढेही आहे. भविष्यकाळात आपल्याला नेमके काय करायचे आहे याचा विचार विद्यार्थी, आई-बाबा यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्याची ही खरी वेळ आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर कोणताही निर्णय न घेता शैक्षणिक प्रक्रियेमध्ये कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, भविष्यकाळामध्ये कोणत्या अभ्यासक्रमाला अधिक महत्त्व असणार आहे, त्या अभ्यासक्रमामधून गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या उणिवा समोर आल्या आहेत त्यावर मात कशी करता येईल याचा विचार करून विद्यार्थ्यांनी व पालकांनी निर्णय घेण्याची गरज आहे.
कोव्हिड-19 ने आपल्याला काही गोष्टींची उणीव आहे, हे दाखवून दिलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने योगा व ध्यानधारणेचा शिक्षणप्रक्रियेत नसलेला समावेश ही उणीव प्राधान्याने समोर आली आहे. याखेरीज आर्थिक साक्षरतेचा अभाव, व्यवसाय सुरू करण्यासंबंधी अजिबात नसलेले मार्गदर्शन, कृतिशील पद्धतीने विचार करण्याची क्षमता, वैचारिक प्रगल्भता, भावनिक-शारीरिक आणि मानसिक अक्षमता, नैराश्य, द्वेष, आव्हाने, अपयश या गोष्टी पचवण्याची ताकद या सर्वांचा विचार करून आपल्या पाल्याला कोणता अभ्यासक्रम निवडायचा याचा निर्णय पालकांनी घेण्याची गरज आहे.
याबाबतीमध्ये समुपदेशनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची अॅप्टिट्यूड टेस्ट करून त्या टेस्टच्या आकलनासंबंधी तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेणे याला शास्त्रीय आधार आहे. त्यामुळे याचा विचार करून मगच पुढील निर्णय घेतला पाहिजे.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही जणांनी त्या निकालावर टीका केलेली दिसून आली. यामध्ये काही माध्यमांचाही समावेश आहे. मात्र, हे वागणे सपशेल चुकीचे आहे, असे माझे मत आहे. दहावी आणि बारावी ची परीक्षा ऑफलाईन व्हावी, यासाठी समाजातील काही घटक प्रयत्न करत होते तेव्हा ही मंडळी तसेच राजकारणी, समाजातील तथाकथित शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते मूग गिळून गप्प बसले होते.
त्यावेळीच सर्वांनी विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यासंबंधी प्रयत्न केले असते, उठाव केला असता तर या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेतून योग्य न्याय मिळाला असता. आज त्याच्याविषयी नकारात्मक भूमिका मांडणे, टीका करणे हे पूर्णतः चूक आहे. आजघडीला जे घडलेले आहे त्याचे स्वागत करून त्यातून चांगले काय घडवता येईल याचा विचार करण्याची गरज आहे.
दहावी आणि बारावी च्या निकालांवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की, मूल्यमापनासाठी परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहणे योग्य नाही. मूल्यमापनाची वेगवेगळी साधने आपल्याला तयार केली पाहिजेत. केवळ शाळेने किंवा महाविद्यालयाने मूल्यमापन करणे हे एकमेव अस्त्र न वापरता आई-वडिलांनी, समवयस्क मित्रांनी, समाजातल्या आजूबाजूच्या लोकांनी, शैक्षणिक संस्थांनी अशा सर्वांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची एक नवीन प्रक्रिया आपल्याला निर्माण करावी लागेल, उभी करावी लागेल. याबाबत विचार करण्याची वेळ आता आली आहे.
शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये संशोधनाला अजिबात महत्त्व नाही, कृतिशीलतेला कुठेही स्थान नाही, श्रमाला काहीही किंमत नाही याविषयी शिक्षणाच्या प्रक्रियेतून परीक्षेशिवाय विद्यार्थ्याला कशा पद्धतीने अनुभव देता येतील, कशा पद्धतीने त्याने केलेल्या काहींचे मूल्य ठरवता येईल याविषयी शासनाने शिक्षणक्षेत्रात कार्य करणार्या अधिकारी व्यक्तींना, परदेशात कार्यरत असलेल्या काही मूल्यमापन प्रक्रियांना, इंटरनेटच्या माध्यमातून राबवल्या जाणार्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना विचारात घेऊन मूल्यमापनाचे नवे मॉडेल निर्माण करणे हे सर्वांत महत्त्वाचे काम आहे.
हे न करता आपण पुन्हा ती पाठ्यपुस्तके ऑनलाईन माध्यमातून मुलांना शिकवण्याचा खटाटोप करत आहोत, हे कितपत योग्य आहे? अजूनही संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाईनच्या माध्यमातून पुस्तक शिकवण्याकडेच वळलेली आहे. वेगळा विचार करायला कुणी तयारच नाहीये. शासनाने सेतू अभ्यासक्रम तयार करून वेगळे काय केले आहे? पुन्हा तीच पुस्तके आणि अभ्यासक्रम विद्यार्थी व शिक्षकांच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आपण यातून धडा घेणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दहावी-बारावीच्या निकालांनी आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? अन्यथा गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेली 'री'च पुन्हा ओढणार असू तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. भविष्यात कोरोनासारखी दुसरी एखादी आपत्ती आली तर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न या पद्धतीने आपण कार्यरत राहू. समाजाच्या हिताच्या द़ृष्टीने ते योग्य नाही.