Latest

दर्जेदार पर्यटक म्हणजे काय?

Arun Patil

गोव्यात दर्जेदार पर्यटकांनीच यावे… जास्त पैसे खर्च करणार्‍या पर्यटकांनीच गोव्यात यावे… परदेशी पर्यटकांनी मोठ्या संख्येने गोव्यात यावे आणि भरपूर खर्च करावा… बेशिस्त वर्तन करणार्‍या देशी पर्यटकांनी गोव्यात येऊ नये… यासारखी विधाने अधूनमधून वारंवार होत असतात.

मंत्री, नेते, पर्यटनाशी संबंधित संस्थांचे पदाधिकारी अशी विधाने करतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही अलीकडेच गोव्यात दर्जेदार पर्यटक आले पाहिजेत, अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली. काही राजकीय नेते देशी पर्यटकांचा अवमान होईल, अशीही विधाने करतात, केलेली होती. देशी पर्यटकांना कमी लेखणे आणि श्रीमंत पर्यटकांना चुचकारण्याची राजकीय नेतृत्वाची मानसिकता लख्ख दिसते. या पार्श्वभूमीवर प्रश्न पडतो की, दर्जेदार पर्यटक या शब्दयोजनेची व्याख्या काय? पर्यटकांचा दर्जा कसा ठरवणार? तो कोण ठरवणार? जास्त पैसे उधळण्यासाठी पर्यटक गोव्यात आला असेल, तर तो दर्जेदार का? पैशांच्या फूटपट्टीने दर्जेदार पर्यटन, पर्यटक मोजता येतात का? तसे करणे योग्य आहे का?

देशी पर्यटक गैरवर्तन करतात हा प्रमुख आक्षेप राजसत्तेतील नेतृत्वाचा, काही सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच पर्यटनाशी संबंधित संस्थांच्या काही पदाधिकार्‍यांचा आहे. अनेक देशी पर्यटक दारू पिऊन धिंगाणा घालतात. ते सार्वजनिक ठिकाणी खुलेआम दारू पितात. ते सार्वजनिक ठिकाणी, समुद्रकिनारी अन्न शिजवतात आणि पंक्ती उठवतात. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते. त्यांच्यामुळे सौंदर्याला बाधा येते. काही देशी पर्यटक मुली, महिलांशी छेड काढतात. काहीजण परदेशी महिला पर्यटकांना त्रास देतात. काही देशी पर्यटक चालत्या वाहनांतून बाहेर डोकावत दारू पितात. काही देशी पर्यटक वाहनांवर बसतात, तर काहीजण दुचाकी, चारचाकी थेट समुद्रात घेऊन जातात. या गैरवर्तनाची छायाचित्रे, ध्वनिचलचित्रफिती समाजमाध्यमात मोटूमो (मोबाईल टू मोबाईल) फिरत राहतात. काही देशी पर्यटकांच्या या वर्तनाचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

निषेध करून अथवा दर्जेदार म्हणजे श्रीमंत पर्यटकांनीच यावे असे म्हणून व्यवस्था बदलत नसते. पर्यटनाची गाडी शिस्तीच्या रुळावरच राहील, याची जबाबदारी कोणाची? दायित्व कोणाचे? श्रीमंत पर्यटक हे मूळ आजारावरील औषध नव्हेच. गोवा म्हणजे वेश्या व्यवसायाचे डेस्टीनेशन, ड्रग्ज डेस्टीनेशन असे एक सामायिक समीकरण होऊन मोठा काळ लोटला. या समीकरणाची आर्थिक व्याप्ती कोट्यवधी रुपयांची आहे. गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली चालणार्‍या अनैतिक, बेकायदा धंद्यांचा अवाढव्य पसारा आणि दर्जेदार पर्यटक, दर्जेदार पर्यटन याचे गणित कसे सोडविणार? गोव्यातील हॉटेलमधील पदार्थांचे दर परवडत नाहीत. त्यामुळे काही पर्यटक खुल्या जागेत स्वयंपाक करतात. अशा पर्यटकांसाठी अन्न पदार्थ शिजविण्याच्या सोयी-सुविधा देऊ, असे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले होते. अशा प्रकारची मात्रा देणे हे मूळ आजारावरील रामबाण उपाय होतील.

गैरवर्तन करणार्‍या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्याची, प्रसंगी त्यांना वठणीवर आणण्याची जबाबदारी कोणाची? गोव्यात जाऊन काहीही केले तरी चालते, हा गोड गैरसमज एका रात्रीत तयार झालेला नाही. तसेच तो एका रात्रीत दूरही होणार नाही. त्यासाठी पर्यटनाचे कागदावरील चित्र प्रत्यक्षात साकारण्याचे आव्हान पेलावे लागेल. दारू स्वस्त विकायची, तर रिकाम्या बाटल्यांचे काय करायचे आणि पर्यटकांना काय करू द्यायचे नाही, हा विचार दारू स्वत विकण्यापूर्वी करायला पाहिजे. (आता तीही महागली, पिक्चर बदलले, असो.) दरवर्षीच 31 डिसेंबर येणार आणि दरवर्षीच कचर्‍याच्या डोंगरांसह नानाविध समस्यांचे आव्हान असतेच. नेहमीच येतो पावसाळा. तो आला की आपला पूर्वज म्हणतो पुढच्या वर्षी नक्क्की घर बांधायचे. याच धर्तीवर दरवर्षी घोषणा होतात समुद्रकिनारे चकाचक करू… वगैरे…वगैरे… यामध्ये नवीन घोषणेची भर पडली, 'गोव्यात दर्जेदार पर्यटकांनीच यावे…' वगैरे…वगैरे… रोग शेपटाला आणि औषध शेंडीला. टरफलं रे टरफलं!

– सुरेश गुदले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT