October Sankashti Chaturthi 
Latest

त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्

दिनेश चोरगे

गणेश हा समूहमानसाचा देव आहे. ते लोकदैवत आहे. शिव व गणेश एकाच कूळ परंपरेतले देव असल्याने त्यांची पार्थिवपूजा ग्राह्य ठरते. पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्त्वप्रधान! पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे जड तत्त्व आहे. तो मूलाधार आहे. म्हणूनच अथर्वशीर्षात 'त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्' असे म्हटले आहे.

मराठी वाङ्मयात गणेशोपसकांनी स्वतंत्र काव्यनिर्मितीचा आविष्कार केलेला दिसतो.त्यातून गणेशवंदनाची थोर परंपरा जशी लक्षात येते, तसेच गणेशोपासनेची रूढ असलेली पद्धतही अधोरेखित होते. गणेशोपसकांनी गणांचा नायक, अधिपती, बुद्धिमान, सर्वांचा प्रमुख अशा विशेषणांनी गणपतीला गौरवले आहे. त्याला 'इंद्र'देखील म्हटले आहे. प्रा. कृ. मो शेंबणेकर यांनी 'गणेश रहस्यदर्शन' या शीर्षकाचे दोन लेख 1964 मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यात ऋग्वेदात उल्लेखलेले 'ब्रह्मणस्पति' व 'बृहस्पति' या देवता ॐकाराचे उत्क्रांत रूप असून तोच गणेश असल्याचे मत प्रतिपादिले आहे. गणेशाला बुद्धी, कला, विद्या यांची देवता मानण्यामागील सूत्र हेच असावे.

गणेश अथर्वशीर्षांत गणेशविद्या व गणेश बीजमंत्र उल्लेखलेला आहे. हे अथर्वशीर्ष उपनिषदांतर्गत असून त्यांचा मंत्रद्रष्टा ऋषी गृत्समद आहे; मात्र तो अवैदिक आहे. अथर्वशीर्षातील गणेश वर्णनात त्याला 'व्रातपती' म्हणून नमन केले आहे. 'नमो व्रातपतयेनमो गणपतये नमो प्रमथपतये' असे वंदन केलेले आढळते.

गणेशही आर्यपूर्व तांत्रिक देवता असून त्याचे उत्क्रांत रूप श्रौतवाङ्मयात आपण स्वीकारले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी भाषाशास्त्रीय पुराव्यांआधारे वक्रतुंड आणि एकदंत असा उल्लेख असलेली गणेशोपासना अंदाजे 2200 ते 2500 वर्षांइतकी प्राचीन ठरू शकते, असे म्हटले आहे. आनंदगिरीच्या शंकर दिग्विजय ग्रंथात गाणपत्याचे सहा प्रकार नोंदवले आहेत. हे प्रकार त्याचे रूप-स्वरूप व कार्यशैलीच्या भिन्‍नतेमुळे पडले आहेत. त्यातील महागणपती प्रमुख असून तो सर्वशक्‍तिमान आहे. तो दहा हातांचा पाशांकुश व मोदधारी, कमलधारी आहे. दुसरा हेरंब रक्‍तवर्णी आठ-दहा हातांचा सिंह व बैलावर आरूढ असलेला नागबंध बांधलेला आहे. तिसरा उच्छिष्ट गणेश अन्‍नविपुलतेचे प्रतीक असून सुव्यवस्थापक आहे. चौथा संतान गणेश पुत्रप्राप्तीच्या हेतूने पुजला जातो. पाचवा हरिद्रागणेश विवाहकांसाठी, विवाहेच्छुकांसाठी उपयुक्‍त असून वैभवसंपन्‍नतेचे प्रतीक आहे. सहावा स्वर्ण गणेश. ऐश्‍वर्याचे प्रतीक होय.

पूजाद्रव्य – गणेशाला प्रिय असणार्‍या दुर्वा शीतलता व वंशवृद्धीचे प्रतीक असून अमृतवल्ली म्हणून हरळीचे आयुर्वेदात महत्त्व आहे. 'शमीशमयते पापं' अशी ख्याती असलेल्या शमी व मांदारपुष्प गणेशाला प्रिय असून मंदारवृक्षातील खोडात प्राप्त होणारा मांदार गणेश विशेष पूजनीय आहे.

गणेशाची शुंडा : गणेशाच्या उजव्या-डाव्या सोंडेबाबत काही संकेत ठरलेले आहेत. उजवीकडे वळलेली शुंडा दक्षिण दिशेचा स्वामी यमराज यावर प्रभाव गाजवते. सूर्यनाडी प्रभावित करते. हा गणेश जागृत, कडक मानला जातो. डाव्या सोंडेचा मात्र सौम्य मानला आहे. पार्थिव गणेश (गणेश चतुर्थी वगैरे सार्वजनिक समारंभातला) डाव्या सोंडेचाच असतो. डॉ. नंदितमभू यांनी गाणपत्य संप्रदायावरील ग्रंथात याचा सविस्तर विचार केला आहे. संत ज्ञानदेवांची मात्र 'शुंडादंड सरळू' असे म्हणून वादाऐवजी संवादाची समन्वयाची भूमिका घेतली आहे, तर समर्थांनीही 'सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना' असा सरळ मार्ग स्वीकारला आहे. गणेशाची तांत्रिक स्वरुपातील पूजा-उपासना सिंधू संस्कृतीपासून असलेली दिसते. राघवचैतन्य यांनी रचलेल्या एका स्तोत्रात तांत्रिक गणेशाचे रूप वर्णन केले आहे.

आश्‍लिष्टं प्रियता सरोजकर या रत्नस्फुरत् भूषया।
माणिक्य प्रतिभं महागणपति विश्‍वेशमाशास्महे॥

या उल्लेखात प्रियेला आलिंगन दिलेला माणिकासम लाल प्रभा असलेला गणेश तांत्रिक स्वरूपातला आहे. जायसीच्या पद्मावत काव्यात त्याचा तांत्रिकाशी संबंध असल्याचे म्हटले आहे; मात्र महाराष्ट्रात तांत्रिक गणेशोपासना अभावानेच आढळते, असे मत प्रसिद्ध संशोधक कै. रा. चिं. ढेरे यांनी नोंदवले आहे.

गणेश हा समूहमानसाचा देव आहे. ते लोकदैवत आहे. गणेशपूजन मुख्यतः पार्थिक रूपातच केले जाते. लिंगपूजाही पार्थिवच असते. पार्वतीचे हरितालिका व्रतपूजनही पार्थिवप्रधानच आहे. शिव व गणेश एकाच कूळ परंपरेतले देव असल्याने त्यांची पार्थिवपूजा ग्राह्य ठरते. पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्त्वप्रधान! पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे जड तत्त्व आहे. तो मूलाधार आहे. म्हणूनच अथर्वशीर्षात 'त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्' असे म्हटले आहे. गणेशमंत्रात गं हे बीज आहे, ग हे अक्षर गुरुत्त्व, गरीमा, घनता स्पष्ट करते. गणेशातील पार्थिवतत्त्व मानवी देहाशी लय साधते. कारण, देह पार्थिव असतो. पार्थिवतत्त्वाशी हत्तीचा संबंध आहे. वजनदारपणा, गुरुत्त्व व देहनिष्ठतेशी हत्तीचा संबंध आहे. हत्ती स्पर्शसुखाला भुलतो. ही देहलय लक्षात घ्यावी लागते. येथे तांत्रिक पूजेचा अर्थ लागतो. हत्तीची सोंड अत्यंत श्‍लक्ष्ण असते. तो संवेदनाग्राह्य असतो. पालकारण्यात ग्रंथातील संदर्भ मारुती चितमपल्ली यांनी देताना 'यःश्‍लक्षणः सर्व भाषेषु विशुद्धोश्‍चत्तमोत्तमः' असा उल्लेख केला आहे. श्री. द. गोडसे यांनी 'पोत' या ग्रंथात हत्तीला वनराज संबोधून लोकमानसातील त्याचे स्थान प्रतिष्ठित केले आहे. गणेशाच्या पार्थिवत्वाचा व हत्तीमस्तक रूपाचा असा अन्वयार्थ लावता येतो. गाणपत्यात गौतम ऋषींचे नाव घ्यावे लागते. माजलगाव (जि. बीड) जवळ गंगामसला नावाचे गाव असून ते गौतमक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हा सकाळी साळी पेरून संध्याकाळी त्याचा भात शिजवून खात असे. गाणपत्यांच्या नामावलीत जी नावे आहेत, ती अशी –

गणेशो गालवो गार्ग्यो गौतमश्‍च सुधाकरः
श्रीगणेशस्य प्रसादेन सर्व गृण्हन्तु गाणपाः

गणेशतत्त्व समग्र ब्रह्मांडात भरून उरले असून स्वानंद भुवनात श्रीगणेश शक्‍तीसह विराजमान आहे. कर्मसंन्यास भक्‍तांना अमान्य असून कर्म करीत राहून नैष्कर्म्य प्राप्त करणे, हीच उपासना आहे. चतुर्थीव्रत म्हणजे तुर्यावस्था, चतुर्थ अवस्था प्राप्त करणे होय. हे जीवन गणेशप्रीत्यर्थ आहे, असे मानणे म्हणजे चतुर्थीविभक्‍ती. हीच खरी गणेशभक्‍ती होय, ही त्यांची निष्ठा होती.

– डॉ. विद्यासागर पाटंगणकर, संतवाङ्मयाचे अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT