तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा पुढील आठवड्यामध्ये मंत्रालय स्तरावर वास्तू विशारद यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता असून, तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही बाजूंनी मंदिराचा विस्तार करण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्यामुळे भाविक भक्तांना वावरण्यासाठी आज असणारी अरुंद स्थिती बदलून जाणार आहे, अशी माहिती तुळजापूरचे आमदार राणा राणा जगजितसिंह पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या नवीन प्रारूप संदर्भात बोलताना आमदार राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले की, पुढील आठवड्यामध्ये वास्तुशांती मंदिर परिसराच्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांचा आढावा मंत्रालय स्तरावर घेतला जाणार आहे. त्यानंतर या विषयी विकास आराखड्याच्या अनुषंगाने निश्चित माहिती प्राप्त होणार आहे.
विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये मंदिर परिसराची स्वच्छता आणि शहर परिसराची स्वच्छता याला प्राधान्य दिलेले आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांना संपूर्ण मंदिर परिसर आणि शहर परिसर स्वच्छ वाटला पाहिजे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य अधोरेखित होणार आहे. या शिवाय भाविकांची संख्या आणि चारचाकी गाड्यांची संख्या लक्षात घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्था देखील सक्षम करण्यासाठी या विकासा आराखड्यात वाहतूक व्यवस्थेला महत्त्व दिलेले आहे.
आलेली वाहने पार्किंग करणे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक शहरवासीय व भाविकांना अडचणीची होणार नाही असे बदल करण्यात येणार आहेत. वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यामुळे अनेक समस्या शहरात निर्माण झालेल्या आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाय या योजनेमध्ये केलेला आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे.
मंदिराचे शिखर आणि गाभारा या दोन प्रमुख गोष्टी पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट केलेल्या असून, गाभारा संपूर्ण चांदीने मडवला जाणार आहे. त्याचबरोबर देवीचे मुख्य चांदीचे सिंहासन हे भरीव चांदीचे करण्यात येणार आहे. या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नसून, पुढील आठवड्यात मंत्रालय स्तरावर होणाऱ्या बैठकीमध्ये याला मूळ स्वरूप देण्याचा प्रयत्न होणार आहे. भाविकांच्या अडचणीचा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे अरुंद असलेले मंदिर परिसर येथे भाविकांना वावरण्यासाठी जागा कमी पडत असल्यामुळे मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जागा उपलब्ध होणे शक्य असल्यामुळे दोन्ही बाजूंनी मंदिर परिसराचा विकास करून मोकळा परिसर विस्तीर्ण करण्याकडे या आराखड्यात लक्ष देण्यात आले आहे.
दोन्ही बाजूनी मंदिर परिसर वाढवल्यामुळे मंदिरात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जी वाढीव भाविक संख्या लक्षात घेऊन जागा लागणार आहे त्याची पूर्तता होऊ शकणार आहे असेही आमदार राणा जगजीत सिंह पाटील म्हणाले. स्थानिक सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकास आराखड्याच्या प्रत्येक निर्णयाचा अंतिम निर्णय केला जाईल असेही त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने या प्रसंगी सांगितले आहे. सर्व सहमतीने विकास व्हावा या मताचा मी असून, तुळजापुरातील जनतेला या सर्व विकास आराखड्याची माहिती दिली जाईल असे त्यांनी या प्रसंगी सांगितले आहे.
हेही वाचा :