नवी मुंबई ; राजेंद्र आहिरे : अरबी समुद्राचा सुमारे 720 किमी किनारा लाभलेल्या जलसंपन्न कोकणाला यंदा उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. मुंबई आणि उपनगर जिल्हा वगळता उर्वरित 5 जिल्ह्यांत सुमारे 55 गावे आणि 93 वाड्यांना रोज सुमारे 29 टँकरने पाणी पुरवले जात आहे.
कोकणात गतवर्षाच्या तुलनेत यंदा तहानलेल्या गावांची संख्या एप्रिलमध्येच 21 ने वाढली आहे. तहानलेल्या वाड्यांची संख्या मात्र 33 ने घटल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.
कोकणाला सलग 4 वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीचा तडाखा बसला आणि गतवर्षात एकापाठोपाठ एक निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ धडकले. परिणामी, सिंचनाच्या कोणत्याही सुविधा जागेवर राहिल्या नाहीत आणि नव्या निर्माण होऊ शकल्या नाहीत.
उन्हाळा भले गेल्या फेब्रुवारीपासून जाणवू लागला असेल. मात्र, कोकणात पाणीटंचाईची चाहूल ऐन हिवाळ्यातच डिसेंबरपासून लागली. थंडीच्या या महिन्यात दोन गावांसाठी टँकर धावत असलेला रायगड हा एकमेव जिल्हा होता. फेब्रुवारीत रत्नागिरीतील 1 गाव आणि एका वाडीसाठी टँकर धावणे सुरू झाले.
आता मार्चमध्ये उष्णतेची जबरदस्त लाट आली असताना रायगडमधील टँकरवर तहान भागवणार्या गावांची संख्या 38 वर पोहोचली असून, 61 वाड्याही तहानल्या आहेत. रत्नागिरीमधील 11 गावे आणि 11 वाड्यांना 3 टँकरद्वारे तर पालघरमधील 62 गावे आणि एका वाडीला 14 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
* कोकणातील ठाणे आणि सिंधुदुर्गवगळता रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये आजघडीला एकही टँकर धावताना दिसत नाही.
* विदर्भात अमरावतीमधील 2 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 3 अशा 5 गावांसाठी 5 टँकर धावत आहेत.