Latest

व्यक्‍तिमत्‍व : तरुण आहे अजूनही…

backup backup

सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोहचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामे करण्यावर मर्यादा येतात. भगवानी देवींना मात्र थकणे माहीतच नाही. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचे मैदान गाजवायचे स्वप्न पाहत होत्या. यश आणि वय यांचा संबंध नसतो, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

ही कहाणी आहे एका 94 वर्षीय तरुणीची! भगवानी देवी डागर हे त्यांचे नाव. चेहर्‍यावर सुरकुत्यांचे जाळे. पण उत्साह आणि चिकाटी दुर्दम्य म्हणता येईल, अशी. त्या आल्या, त्यांनी पाहिले आणि त्या जिंकल्यासुद्धा! फिनलंडमध्ये रटिनान येथे 29 जून ते 10 जुलैदरम्यान पार पडलेल्या 'वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022' स्पर्धेमध्ये 100 मीटर स्प्रिंट (वेगात चालणे) प्रकारात भगवानी देवी यांनी बावनकशी सोनेरी कामगिरी बजावली आणि सार्‍या देशाने त्यांना अदबीने सलाम केला. ही स्पर्धा 1975 साली सुरू झाली आणि 35 पेक्षा जास्त वय असलेले खेळाडूच त्यात भाग घेऊ शकतात. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोहचली की, तिच्या हालचाली मंदावतात.

कष्टाची कामे करण्यावर मर्यादा येतात. काहींना जास्त अंतर चालणेही जमत नाही. भगवानी देवींना मात्र थकणे कशाला म्हणतात, हे माहीतच नाही. ज्येष्ठतेच्या सगळ्या निकषांना टाटा करत त्यांनी 100 मीटर अंतर अवघ्या 24.74 सेकंदात पार केले. तरीही त्यांचे समाधान झाले नाही. शंभर मीटरचे अंतर जोशात पार केल्यानंतर त्यांनी गोळाफेक प्रकारातही भाग घेतला. तिथेही त्यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली. पाठोपाठ थाळीफेकीत त्यांनी आणखी एका कांस्य पदकावर आपले नाव कोरले.लक्षात घ्या, या स्पर्धेत त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी वयाचे अ‍ॅथलिट पदक जिंकण्याच्या ऊर्मीने उतरले होते. तथापि, भगवानी देवी यांनी सुसाट धाव घेत सर्वांना मागे टाकले. त्यांच्या रूपाने जणू लयबद्ध धावणारे हरणच मैदानात अवतरले होते.

एकाच धडाक्यात त्यांनी तीन पदके जिंकली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे अपार कौतुक सुरू झाले. आजही त्यात खंड पडलेला नाही. त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला लोकांनी भरभरून दाद दिली आहे. एवढेच नव्हे, तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. मंत्रालयाने लिहिले, भारतातील 94 वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले, ही खरोखर प्रेरणादायी कामगिरी आहे. जगभरातील क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय तरुण आपले कर्तृत्व सिद्ध करत असताना, भगवानी देवीदेखील वाढत्या वयाला वाकुल्या दाखवून, आता त्याच मालिकेत चमकू लागल्या आहेत.

विशेष म्हणजे, चेन्नई येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवला. त्या आधी दिल्ली राज्य अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर चालणे, भालाफेक आणि गोळाफेकीत एक नव्हे, तर तब्बल तीन सुवर्णपदके जिंकली होती. अर्थात, हे यश त्यांना साडे-माडे-तीन अशा पद्धतीने मिळालेले नाही. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. या मेहनतीला जबरदस्त इच्छाशक्तीची जोड दिली आणि त्यानंतर त्यांनी यशोशिखर गाठले. फिनलंडमध्ये दोन पदके जिंकल्यानंतर भगवानी देवी डागर यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. हे द़ृश्य पाहून त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले कारण आपल्या कौतुकासाठी एवढ्या प्रचंड संख्येने चाहते उपस्थित असतील, याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मग कुणीतरी ढोल आणला आणि आजींनी त्या ठेक्यावर विमानतळावरच झिंगाट डान्स केला. घरी निघताना आपल्या सगळ्या चाहत्यांना त्या मनोमन धन्यवाद द्यायला विसरल्या नाहीत.

भगवानी देवींचा नातू विकास डागर हादेखील पॅराअ‍ॅथलिट असून, त्याला 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा'नेही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याची आजी असलेल्या भगवानी देवींनी पदके जिंकून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. खरे सांगायचे, तर भगवानी देवी यांनी आपल्या नातवापासूनच क्रीडा क्षेत्रात नाव कमावण्याची प्रेरणा घेतली. विकास जेव्हा विविध स्पर्धांत पदके जिंकायचा, तेव्हा त्याच्यासारखीच कामगिरी आपण का करू शकत नाही? असा प्रश्न त्यांना सतत पडत असे. त्यामुळेच त्यांनी वयाची नव्वदी पार केल्यानंतर चक्क अ‍ॅथलिट होण्याचा निर्णय घेतला. घरातील लोकांना त्यांनी आपला मनोदय बोलून दाखवला, तेव्हा कोणीच ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही कारण ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचे मैदान गाजवायचे स्वप्न पाहत होत्या. त्यांच्यातील ही जिंकण्याची ऊर्मी नातू विकास याने ताडली. फिनलंडमधील स्पर्धा जवळ येऊ लागली, तसतसे विकास याने आपल्या आजीला त्यासाठी विशेष प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामुळे भगवानी देवी यांनाही पदकांची खुणावू लागली. अखेर तो दिवस आला आणि त्यांनी हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने अभूतपूर्व कामगिरी बजवील. तीन आंतरराष्ट्रीय पदके खिशात टाकून त्या चालत्या-बोलत्या परिकथा बनल्या.

1928 साली हरियाणातील खिडका या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या भगवानी देवी यांचे बालपण हलाखीत गेले. त्यांचे फारसे शिक्षणही झाले नाही. याचे कारण म्हणजे, लहान वयातच त्यांच्या पालकांनी त्यांचा विवाह लावून दिला. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली; मात्र त्या डगमगल्या नाहीत. कठीण परिस्थितीला त्यांनी आपल्यापुढे वाकायला लावले. त्यांना हवासिंह नावाचा मुलगा असून, त्या दिल्लीतील नजफगढ भागात वास्तव्य करून आहेत. मुलगा, सून, नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे. डागर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भगवानी देवी यांच्या कामगिरीचा अभिमान नव्हे, तर गर्व आहे. एवढी असामान्य कामगिरी बजावूनही भगवानी देवी यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत.

भगवानी देवी यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. रोज किमान तीन किलोमीटर चालणे आणि त्यानंतर अन्य व्यायाम करून त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवले आहे. दिल्ली आणि चेन्नईतील स्पर्धांमध्ये पदके जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावला. जोडीला नातू विकास याच्याकडून टिप्स घेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचे स्वप्न पाहिले. विकास यालाही आपल्या आजीच्या मेहनतीबद्दल शंभर टक्के खात्री होती. त्यानेच आजीला प्रोत्साहन दिले. येथे हेही सांगितले पाहिजे की, नातू विकास याची अनेक विक्रम, पदकं पाहून अवघ्या वर्षभरापूर्वी भगवानी देवी यांनी प्रेरणा घेतली. 'हम भी कुछ कम नही' हे सिद्ध करण्याचा ध्यासच त्यांनी घेतला होता. त्यांनी सुरुवात केली तीच मुळी विश्वविक्रम रचण्याच्या हेतूने. त्यात त्यांना काही शतांश सेकंदांनी अपयश आले. मात्र, राष्ट्रीय विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. यश आणि वय यांचा दुरान्वयानेही संबंध नसतो, हे सप्रमाण सिद्ध केलेल्या भगवानी देवी यांनी आजच्या युवा पिढीपुढे आगळा आदर्श ठेवला आहे, यात शंका नाही.

  • सुनील डोळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT