डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-शिळ मार्गावरील गोळवली गावामध्ये विकृत परंतू भयंकर प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवली एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचे गुप्तांग त्याच्याच सहकाऱ्यांनी छाटून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. आदल्यादिवशी रात्रीच्या वेळी ओली पार्टी केल्यानंतर हल्लेखोरांनी गाढ झोपलेल्या या कामगाराला उठवून पकडले आणि धारदार हत्याराने त्याचे गुप्तांग कापून शरीरापासून विलग केले. यात गंभीर जखमी झालेल्या या कामगाराला मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सद्या हा कामगार मृत्यूशी झुंज देत आहे.
संजयकुमार मुन्सीराम राम (३१) असे जखमी कामगाराचे नाव आहे. तर सोनूकुमार सियाराम राम (३२) करणराम आश्रयराम राम (२८) आणि सुरेंद्रकुमार रमेश राम (३५) अशी हल्लेखोरांची नावे असून पोलिसांनी आतापर्यंत यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.
यातील जखमी संजयकुमार आणि आरोपी सुरेंद्रकुमार हे दोघे डोंबिवली एमआयडीसीतील जिमेन्सिटक कंपनीत नोकरी करतात. संजयकुमार आणि तिघे हल्लेखोर अनेक महिन्यांपासून गोळवलीतील शंकरशेठ चाळीत एकत्र राहतात. स्वयंपाक करून एकत्र जेवण करतात. त्यांच्यात अधूनमधून ओली पार्टीदेखील होत असे. मंगळवारी रात्री राहत्या घरात चौघांनी ओली पार्टी करण्याचा बेत आखला. त्यासाठी मच्छीसह गावठी दारू आणण्यात आली. सगळ्यांनी मिळून जेवण तयार केले. एकत्रित दारू प्यायली. सोनूकुमार याने संजयकुमार याला सिगारेट आणण्यास सांगितले. संजयकुमार बाजूच्या टपरीतून सिगारेट आणण्यास गेला. तर अलीकडे संजयकुमार घराबाहेर गेल्यानंतर त्याला मारण्याचा सोनूकुमार, रणराम आणि सुरेंद्रकुमार या तिघांनी कट रचला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
रात्री १२ वाजेपर्यंत ओली पार्टी आटोपल्यावर सर्व जण झोपी गेले.. मध्यरात्री एक वाजता सोनूकुमार याने संजयकुमार याला झोपेतून उठवले जुन्या कौटुंबिक भांडणाचा राग मनात ठेऊन भांडण सुरू केले. भांडण वाढत गेल्यानंतर करणराम आणि सुरेंद्रकुमार यांनी संजयकुमार याला घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर सोनूकुमार याने धारदार शस्त्राने संजयकुमार याचे गुप्तांग शरीरापासून विलग केले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याचे पाहून हल्लेखोर घाबरले. सोनूकुमार, करणराम आणि सुरेंद्रकुमार या तिघांनी उचलून संजयकुमार याला शिवम नामक एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे संजयकुमारवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून त्याला मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. अशाही अवस्थेत जखमी संजयकुमार याने त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी पोलिसांसमोर कथन केली. त्याच्या जबानीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. संजयकुमार याचे शिश्न छाटण्यापर्यंत त्याच्याशी मुख्य मारेकरी असलेल्या सोनूकुमार याच्याबरोबर असलेल्या वादाचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश डांबरे अधिक तपास करत आहेत.