कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : अॅड. बी. एस. पाटील यांच्या निसर्ग चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी सकाळी दै.'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनातील प्रत्येक चित्राची डॉ. जाधव यांनी पाहणी करीत माहिती जाणून घेतली.
शाहू स्मारक भवन येथे अॅड. पाटील यांचे निसर्ग चित्र प्रदर्शन 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत भरविण्यात आले आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ते सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे. डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भुदरगडचे माजी आ. बजरंग देसाई, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
'निसर्ग चित्र' प्रदर्शनात दीपस्तंभ, सागर लहरी, ओथंबलेला सागरी किनारा, आभाळाला न्हाऊ घालणारा लहरी वारा या सार्यांना प्रतिभेने चित्रकार पाटील यांनी कुंचल्याने रेखाटले आहे. निसर्ग चित्रांची अलौकिक प्रतिभा त्यांच्या कुंचल्यातून प्रदर्शनात अवतरली आहे.
यावेळी इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षा प्रा. अरुणादेवी पाटील, प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर, प्राचार्य डॉ. एस. व्ही. जावरकर, प्राचार्य अनिल जोशी, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक सुरेश पवार, डॉ. सुभाष देसाई, विश्वास चौगुले, मदन पाटील, आर्किटेक्ट राजेंद्र पाटील, संपतराव पाटील, साहित्यिक प्रा. दि. बा. पाटील, कवी प्रा. डॉ. दीपक स्वामी आदी उपस्थित होते.