Latest

डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर नऊ वर्षात आले अनेक चढ उतार; सत्र न्यायालयातील खटला मध्यावर

अमृता चौगुले

महेंद्र कांबळे

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला नऊ वर्षे पूर्ण होत असताना खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात विविध आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली असून खटला मध्यावर आला आहे. त्यामुळे खटल्याचा निकाल केव्हा आणि काय लागणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. याच दरम्यान हजारो लाखो कॉल तपासले गेले. हिदुत्ववादी संघटना, बोंधू बाबा तसेच सर्वच पातळीवर पुणे पोलिस आणि एटीएसचा तपास सुरूच होता. त्यावेळी अनेकांच्या चौकशी करण्यात आल्या सर्व बाजू तपासण्यात आल्या. या दरम्यान पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

प्लॅनचीट प्रकरणाने पुणे पोलिसांवर टिकेची झोड आणि सीबीआयकडे तपास वर्ग

याच दरम्यान तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅनचिटच्या मदतीने गुन्ह्याचा तपास केल्याच्या बातमीने पुणे पोलिसांवर टिकेची झोड उठल्यानंतर आणि विविध बाजूंनी तपासात हाती काहीच लागले नाही. याच दरम्यान मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना एटीएसने अटक केल्यानंतर दोघांनी न्यायालयातच तत्कालीन एटीएस प्रमुखांवर गुन्हा कबुल करण्यासाठी 25 लाख ऑफर केल्याचे म्हटले होते. परंतु, त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावर नंतर न्यायालयातच घुमजाव केला. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला.

सीबीआयच्या हाती 2016 ला सापडला संशयीत आरोपी डॉ. विरेंद्रसिंह तावडे

जून 2016 ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला पनवेल परिसरातून अटक केली. सीबीआयने 1 जून रोजी वीरेंद्रसिंह तावडे याच्या पनवेल येथील घरी आणि सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता. या प्रकरणी आरोपपत्रात डॉ. विरेंद्रसिंह तावडेच गुन्ह्याच्या कटातील मुख्य सुत्रधार असल्याचे म्हटले होते. तसेच गोवा बॉम्बस्फोटातील सहभागी सारंग अकोलकर आणि विनय पवार हेच मारेकरी असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न सीबीआयकडून करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास

डॉ. दाभोलकरांच्या नातेवाईकांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये उच्च न्यायालयाने स्वतःच्या देखरेखीखाली तपास ठेवला. यामध्ये सीबीआयने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात आणखी प्रगती करताना ऑगस्ट 2018 रोजी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर, अमित दिगवेकर, अमोल काळे, राजेश बंगेरा यांना याप्रकरणी अटक झाली. पुढे याप्रकरणात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार अंदुरे आणि कळसकर यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले.

गौरी लंकेश खुनातील आरोपींचा दाभोलकर प्रकरणातही सहभागाचा दावा

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यासाठी पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे यानेच दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणारा औरंगाबादच्या हल्लेखोरास पिस्तुल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला होता. डॉ. विरेंद्रसिंग तावडे यांच्या सोबतीने इतर आरोपींनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे पुरवणी आरोपपत्रात त्यांनी म्हटले. परंतु, दिगवेकर, बंगेरा, काळे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयाने मुदत न मागितल्याने तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने सीबीआयवर नामुष्कीची वेळ देखील ओढवली होती.

गौरी लंकेश प्रकरणातील जबाबानंतर वकीलाला झाली होती अटक

जून 2018 मध्ये गौरी लंकेश प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीच्या नोंदविलेल्या जबाबात त्याला त्याचेच वकील असलेले अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनीच पिस्तुल नष्ट करण्याचा सल्ला दिला असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ते पिस्तुल कळकसरने मुंंबई येथील खाडीत फेकून दिले होते. त्याचाच धागा पकडत सीबीआयाने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या विक्रम भावे याला अटक केली होती. खाडीत फेकून दिलेले पिस्तुलही सीबीआयला मिळाले. पुढे पुनाळेकरांना जामीन देखील मिळाला. याच दरम्यान, देशात कोरोनाची लाट पसरल्याने न्यायालयातील प्रकरणे चालण्याची गतीही धिमी झाली होती. त्यामुळे या प्रकरणात तारिख पे तारिखच मिळत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या खटल्याच्या सुनावणीस आता गती मिळत आहे.

डॉ. दाभोलकर खुन खटल्यात आता पर्यंत विविध आठ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली आहे. सध्या खटला मध्यवर्ती टप्प्यात आला आहे.

– अ‍ॅड. प्रकाश सुर्यवंशी, विशेष सरकारी वकील, सीबीआय.

दाभोलकर खून प्रकरणात यांची नोंदविण्यात आली आहे साक्ष…

याप्रकरणात आरोपींना गोळीबार करताना पाहणार्‍या महापालिकेच्या कर्मचार्‍याची साक्ष सरकारी तसेच बचाव पक्षाने नोंदवली आहे. तसेच दाभोलकरांच्या खुनानंतर जो पंचनामा करण्यात आला होता. त्यावेळी जो पंच नेमण्यात आला होता. त्याची देखील साक्ष नोंदविण्यात आली आहे. तसेच दाभोलकरांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. हरिश ताटिया आणि डॉ. मनोज शिंदे यांनी केले होते. त्यापैकी डॉ. तावरे यांची साक्ष साक्ष नोंदविण्यात आली आहे. तसेच दाभोलकर ज्या ठिकाणी राहत होते तेथील एकाची तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या संघटनेत काम करणार्‍या एकाची साक्ष याप्रकरणात नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणात एकूण 32 साक्षीदार आहेत. तसेच नवव्या साक्षीदाराची अंशतः साक्ष नोंदविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT