RBI- Index 
Latest

डिजिटल पेमेंटला कोरोनाने दिला ‘बूस्टर’

अमृता चौगुले

डिजिटल व्यवहाराला कोरोना संसर्गाने एकप्रकारे बूस्ट दिला आहे. मेट्रो शहरातच नाही, तर खेडोपाडी ऑनलाईन व्यवहार होत आहेत. डेबिट कार्ड, यूपीआय पेमेंट, नेट बँकिंग, फोन बँकिंग यासारख्या सुविधांमुळे ऑनलाईन व्यवहारांचा पसारा वाढत चालला आहे.

कोणत्याही देशातील आर्थिक परिवर्तन हे स्थानिक नागरिकांच्या व्यवहाराच्या बदलत्या शैलीवरून कळते. आजच्या काळात सर्वच मेट्रो शहरातील चहावाला असो किंवा ज्यूसवाला, भाजीवाल्याकडेदेखील क्यूआर कोडने पेमेंट करण्याची सोय आहे. त्यामुळे खिशात पैसे नसले, तरी लोकांना काळजीचे काम राहिले नाही. सर्व प्रकारचे व्यवहार करणे सोयीचे झाले आहे. 2016 मध्ये नोटाबंदी करूनही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले नव्हते. वास्तविक, रोकडटंचाई असूनही 2016-17 या काळात केवळ दोन ते अडीच टक्केच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाले. त्याचवेळी 2020-21 च्या आर्थिक वर्षात डिजिटल व्यवहारांत 30.2 टक्के वाढ झाली.

गेल्या वर्षीच्या बारा महिन्यांत डिजिटल व्यवहारांत सुमारे 76 टक्के वाढ झाली आहे. 'भारत डिजिटल मिशन'च्या अपेक्षेपेक्षा गेल्या वर्षी व्यवहाराचे प्रमाण वाढले. लहान शहरांतही ऑनलाईनचा ट्रेंड वाढला. 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत महानगरांत ऑनलाईन व्यवहारांत 76 टक्के वाढ झाली. त्याचवेळी लहान शहरे आणि खेड्यातही हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत राहिले आहे.

मालमत्ता खरेदीत 69 टक्क्यांपर्यंत डिजिटल व्यवहार वाढले. सर्वाधिक व्यवहार हे यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग या माध्यमातून झाले. त्याचवेळी लहान व्यवहारांसाठी पेटीएम किंवा अन्य क्यूआर मोडस्चा वापर केला. 2019 आणि 2021 मध्ये मोबाईलच्या मदतीने होणार्‍या व्यवहारांत 30 ते 35 टक्के वाढ झाली आहे. डिजिटल वॉलेट जसे की, अ‍ॅमेझॉन पे, अ‍ॅपल पे, गूगल पे यामुळेही ऑनलाईन व्यवहार सुलभ झाले. गेल्या महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात 355 कोटींपेक्षा अधिक व्यवहार डिजिटल माध्यमातून होत असल्याचे सांगितले. सर्व प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारांची रक्कम एकत्र केल्यास त्याची रक्कम ही 6 लाख कोटींवर राहिली आहे. आरबीआयच्या मते, नवीन डिजिटल व्यवहारांचा निर्देशांक (आरबीआय-डीपीआय) हा मार्च 2020 मध्ये 207.84 होता, तो 2021 च्या मार्च महिन्यांत 270.59 वर पोहोचला.

ट्रेंड वाढण्याची कारणे

जी मंडळी सुरुवातीला डिजिटल व्यवहाराला घाबरत होते, तेच त्याचा बिनधास्त वापर करत आहेत. डिजिटल व्यवहारांमुळे बँकेत जाण्याची, एटीएमवरून पैसे काढण्याची कटकट न राहिल्याने ही मंडळी समाधानाने ऑनलाईन व्यवहार करत आहेत. कोठेही जाताना खिशात नोटा बाळगून जाण्याचीदेखील गरज राहिलेली नाही. फोन बँकिंगमुळे व्यवहारात सुलभता आली. याशिवाय डिजिटल पेमेंट लोकप्रिय होण्यामागे स्मार्ट फोनदेखील कारणीभूत आहे. या कारणामुळे 90 टक्क्यांपेक्षा अधिक व्यवहार ऑनलाईन माध्यमातून होत आहेत. डिजिटल व्यवहारात क्रांती आणली ती क्यूआर कोडने. अर्थात, क्यूआर कोडमुळे लहानसहान व्यवहार होत असले, तरी भविष्यात याच माध्यमाचा अधिक वापर होणार आहे. जनिपर रिसर्चच्या मते, 2024 पर्यंत क्यूआर कोडच्या माध्यमातून होणार्‍या डिजिटल व्यवहारांचे प्रमाण हे 27 टक्क्यांपेक्षा अधिक राहील. सध्या मोबाईल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन केला जातो. परंतु, आगामी काळात मोबाईल सेटमध्ये ही सुविधा इनबिल्ट असेल. यात क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही. याप्रमाणे थेट व्यवहार होतील.

सकारात्मक परिणाम होईल

प्रश्न असा की, डिजिटल व्यवहाराच्या क्रांतीने सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात काय बदल झाला? दोन वर्षांपूर्वीचा अभ्यास सांगतो की, धनादेश देण्याच्या तुलनेत रोख रक्कम देताना अधिक त्रास होतो. कारण, रोख व्यवहाराबाबत लोक अधिक भावनिक असतात. डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार करताना आपल्याला रोख रक्कम द्यायची गरज नसते आणि धनादेश देण्याची गरज भासत नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांकडे कल वाढत चालला आहे. तात्पर्य एवढेच की, डिजिटल पेमेंट मोडस्मुळे आगामी काळात आपली जीवनशैली आणखी सुलभ होईल.

– जयदीप नार्वेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT