नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अदानी 'हिंडेनबर्ग'ने समूहाबाबत अहवाल सादर केल्यानंतर बसत असलेले धक्के अजूनही सुरूच आहेत. क्रेडिट सुईस आणि सिटी बँकेने अदानींच्या कंपन्यांचे रोखे तारण म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आता अमेरिकेतील 'डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स'मधून अदानी एंटरप्रायझेस या कंपनीला हटवण्यात आले आहे.
'एस अँड पी डाऊ जोन्स इंडायसेस' ही वित्तीय बाजार निर्देशांकांसाठीची प्रमुख व नामांकित कंपनी आहे. अदानी एंटरप्रायझेस (एक्सबीओएम : ५१२५९९) या कंपनीला समभागांत गैरप्रकार आणि अकाऊंटिंगमधील फसवणुकीच्या आरोपांमुळे सुरू झालेल्या मीडिया आणि स्टेकहोल्डर्सच्या विश्लेषणानंतर 'डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स'मधून काढून टाकले जाईल, असे 'एस अँड पी डाऊ जोन्स इंडायसेस ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ७ फेब्रुवारीपासून समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला यादीतून हटवण्यात येणार आहे. एस अँड पीची भारतात मुंबई शेअर बाजारासोबत भागीदारी आहे व सेन्सेक्समध्ये एस अँड पी सहभागी आहे. अदानींच्या साम्राज्याची झाडाझडती सुरू न्यूयॉर्कपासून लंडन आणि टोकियोपर्यंतच्या वित्तीय संस्था गौतम अदानी यांच्या साम्राज्याचे पोस्टमॉर्टम करू लागल्या आहेत. अदानींच्या कंपन्यांचे मूल्य १०० अब्ज डॉलरनी कमी झाल्याचा हा परिणाम आहे. यात एकेकाळी अदानी यांना पाठिंबा देणाऱ्या परदेशी वित्त संस्थांमध्ये सिटी ग्रुप इंक., क्रेडिट सुईस ग्रुप एजी आणि बार्कलेज पीएलसी यांचा समावेश आहे. मात्र, आता त्यांनी अधिक तारण मागणे आणि मार्जिन लोनसाठी अदानी कंपनीच्या सिक्युरिटीज्चा वापर थांबवला आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'च्या 'सेंटर फॉर इकॉनॉमिक परफॉर्मन्स'चे प्रोफेसर टॉम किर्चमायर यांच्या म्हणण्यानुसार, पैसे कर्जाऊ देण्यासाठीचा भरवशाचा प्रदेश म्हणून भारताकडे पाहता येत नाही. बँका अजूनही कर्जे देण्यासाठी उत्सुक आहेत; मात्र असे दिसते की, चीनची जागा घेण्यास भारत अजून तितका सक्षम नाही.
अदानी पोर्टस् कंपनीने गुरुवारी नियोजित वेळापत्रकानुसार डॉलर बाँडवर परतावा जारी केला आहे. बाजारपेठेचा विश्वास पुन्हा मिळविण्याचा अदानी प्रयत्न करीत आहेत. तारण म्हणून ठेवलेल्या शेअर्सच्या माध्यमातून पूर्वी घेतलेल्या काही कर्जाची परतफेड करण्यासाठी अदानी बँकांशी चर्चा करीत आहेत, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले.
अर्धा डझन मोठ्या कंपन्यांचा समावेश असलेल्या अदानी समूहाने एक अब्ज डॉलरच्या कर्जासाठी तारण म्हणून आपल्याकडील सुमारे ३० कोटी डॉलर किमतीचे शेअर्स सादर केले आहेत, असे वृत्त 'ब्लूमबर्ग न्यूज'ने ३१ जानेवारी रोजी दिले आहे. हे कर्ज बार्कलेज व इतर काही बँकांच्या समूहाने अदानींना दिले होते. मिझुहो फायनान्शियल ग्रुप इंक. च्या सिक्युरिटीज् डिव्हिजनचे अदानींशी पूर्वी काही व्यवहार होते. या कंपनीकडून अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांची शहानिशा करण्यात येत आहे, असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योशिरो हमामोटो यांनी गुरुवारी टोकियो येथे पत्रकारांना सांगितले.