देशातील सुमारे 90 टक्के लोकसंख्येला 'डी' जीवनसत्त्वाची कमतरता भासतेय. उन्हाळ्यात उन्हात बाहेर न पडल्यामुळे या काळात या रुग्णांची संख्या वाढते आहे. एवढेच नाही तर उन्हाचा त्वचेला त्रास होऊ नये म्हणून बहुतांश लोक क्रीम लावून बाहेर पडतात. या क्रीममुळे उन्हाचा त्वचेशी संपर्क होत नसल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. त्यामुळे ड जीवनसत्त्व शरीराला मिळू शकत नाही.
भारतात सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात आहे. सर्वसाधारणपणे भारतातील लोकांना 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता भासणार नाही असे मानले जाते. मात्र, हे सत्य नाही. भारतात खूप प्रमाणात लोक 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेने पीडित आहेत. भारतीय लोकांमध्ये ड जीवनसत्त्व याची कमतरता असण्याची दोन प्रमुख कारणे आहेत.
शरीराला उन्हाचा फायदा मिळावा म्हणून शरीराचा एक तृतीयांश भाग उघडा राहणे गरजेचे आहे; पण पारंपरिक भारतीय पेहरावात शरीर झाकून घेण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बैठ्या कामाचे प्रमाण वाढले आहे. वातानुकुलित ऑफिसात बसून लोक दिवसभर बैठी कामेच करतात आणि रात्री घरी जातात.
या जीवनशैलीत उन्हात बाहेर पडण्याचा काही प्रश्नच येत नाही किंवा तशी संधीही मिळत नाही. त्यामुळे या लोकांना आरोग्यासाठी गरजेचे असलेल्या उन्हाचे फायदेही मिळत नाहीत. त्याव्यतिरिक्तही 'ड' जीवनसत्त्वाचा अभाव असण्याची काही कारणे आहेत. जसे त्वचेचा रंग खूप गडद असणे. या रंगाच्या त्वचेत मेलेनिनचे प्रमाण जास्त असते. मेलेनिन अतिनील किरणांना त्वचेत शोषून घेण्यापासून रोखते.
आतापर्यंत उन्हाचे फायदे पाहताना सर्वात प्रचलित गोष्ट हीच होती की उन्हात 'ड' जीवनसत्त्व असते. ज्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात. तसेच, हाडे आणि सांधे यांच्या विकासासाठी ते गरजेचे आहे. त्यामुळे मुडदूससारख्या आजारांपासून बचाव होतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये नव्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की उन्हाचा उपयोग इतरही अवयवांच्या विकासासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ – उन्हामुळे मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि कर्करोग यांसारख्या अनेक आजारांपासून संरक्षण होते.
दर दिवशी योग्य प्रमाणात ऊन अंगावर घेतल्यास क्षयरोग होण्याची शक्यता दूर होते. उन्हामुळे मानसिक आरोग्यावरही प्रभाव पडतो. तसेच, नैराश्य दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच वाजल्यानंतर उन्हे अंगावर घ्यावीत. ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे. सूर्यप्रकाश जेव्हा डोळ्यांवर येतो तेव्हाही डोळ्यातील रेटिनाचा काही भाग सक्रिय होतो. त्यामुळे शरीरात सेरोटोनिन स्रवते. त्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा शरीरात पसरते. त्यामुळे आपली मनोवस्था चांगली करते आणि आनंदी, उल्हासित वाटते.
* सामान्यतः 10 ते 20 नॅनोग्रॅम एवढे डी जीवनसत्त्व शरीराला मिळाले पाहिजे.
* देशात 10 टक्के शहरी लोकसंख्येला 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता भासते आहे असे दिसून आले आहे.
उन्हामुळे शरीराला डी जीवनसत्त्व मिळते. जे शरीरासाठी आवश्यक असतेच परंतु सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त त्याचा नैसर्गिक स्रोत नाही. शरीरात डी जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास हाडे कमजोर होतात. नवजात बालकांमध्ये काविळीची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांना रोज कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवले पाहिजे.
हृदय रोग्यांव्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांनीही हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यातही अंगावर ऊन घेतले पाहिजे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहण्यास मदत होते. तसेच, संसर्गापासूनही त्यांचा बचाव होतो. कोवळे ऊन अंगावर घेतले तर सूर्यप्रकाशापासून निघणार्या अतिनील किरणांमुळे प्रतिकारशक्ती अतिक्रियाशील होत नाही. त्यामुळे व्यक्ती सोरायसिससारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकतो.
डॉ. संजय गायकवाड