Latest

ठाणे : तरुणाईला ड्रग्जचा भस्मासूर घालतोय वेढा

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  सध्या जागतिक पातळीवर ड्रग्जची समस्या दहशतवादानंतर सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे.ड्रग्ज माफियांनी अनेक देशातील तरुणांच्या रक्तात हे विष मिसळवून त्यांना आपल्या नियंत्रणात केले आहे. अफगाणिस्तान, बेलीज, बोलीविया,
कोलंबिया, मॅक्सिको, पाकिस्तान, पनामा, पेरू, केनिया, नायझेरिया, आफ्रिका असे देश आज ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत. या
विषरुपी नशेच्या दलदलीतून तेथील नागरिकांची सुटका करणे हीच सर्वात मोठी समस्या आज तेथील सरकार समोर आहे.

भारतात देखील ड्रग्जचा भस्मासूर हळूहळू आपला वेढा घट्ट करतोय. गेल्या एका महिन्यात भारतात तब्बल दहा हजार कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पकडलेल्या ड्रग्जमुळे भारतात नशेची पकड किती झपाट्याने
घट्ट होतेय हे अधोरेखित झाले आहे. एकदा नशेच्या आहारी गेलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढणे कदापि सोपे नसते. त्यामुळे ड्रग्जरुपी विष देशात पसरुच नये यासाठी वेळीच घेतलेली खबरदारी हेच यातून बचावाचे एकमेव प्रभावी उपाय असल्याचे यातील जाणकार मंडळी सांगतात. सहाजिकच भारतात देखील हे विष पसरू नये यासाठी वेळीच उपाययोजना करणे खूप गरज आहे.

गेल्या महिन्याभरात भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अनेक बड्या कारवाया करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले आहेत. त्यात गुजरात राज्यातील भारतपाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर सर्वाधिक ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तीन हजार
कोटींच्या घरात आहे. महसूल गुप्तचर विभागाने (डीआरआय) गुजरातच्या मुंद्रा बंदरातून काही दिवसांपूर्वी 75 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केले होते. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 375 करोडपेक्षा अधिक आहे. तर याच बंदरावर आता पर्यंत वेगवेगळ्या कारवाईतून तब्बल 20 हजार कोटीहून अधिकचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गुजरातचे हे व्यवसायिक बंदर प्रसिद्ध उद्योग समूह
अदानीच्या अधिपत्याखाली आहे. मुंद्रा बंदरावरून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्यानंतर गुजरात पोलिसांनी द्वारका जिल्ह्यातील वाडीनार येथून 17 किलो ड्रग्ज जप्त केले होते.

स्थानिक पोलिसांनी 17 किलो पकडल्याची माहिती दिली आहे, परंतु अनेक स्थानिक माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये 60 किलोहून अधिक ड्रग्ज ताब्यात घेण्यात आल्याचा उल्लेख आहे. या ड्रग्जची किंमत देखील साडेतीनशे कोटी रुपयांच्या घरात असल्याचा उल्लेख स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी रिपोर्ट मध्ये केला आहे. दरम्यान, अलीकडच्या काही वर्षांत गुजरातच्या समुद्रकिनार्‍यांद्वारे भारतात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. पूर्वी सोने, महागडी घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी करण्यासाठी गुजरातचा समुद्रमार्ग चर्चेत होता.

गुजरातमधील सल्या, ओखा आणि मांडवी सारख्या सौराष्ट्र बंदरांवर सोने, घड्याळे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी केली जात असे. मात्र, आता याच सागरी मार्गाने ड्रग्जची सर्वाधिक तस्करी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर गुजरात एटीएस, स्थानिक पोलीस व कोस्ट गार्डने गेल्या सहा महिन्यात एनडीपीएस कायद्या अंतर्गत 422 गुन्हे दाखल केलेत
आणि जवळ जवळ 667 ड्रग्स तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 25 हजार 699 किलो ड्रग्ज जप्त केले असल्याचे गुजरात पोलिसांनी जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत जवळ जवळ पाच हजार कोटी रुपये आहे.

गुजरातनंतर सर्वाधिक ड्रग्ज महाराष्ट्रातून जप्त
  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या विविध कारवाईत जुलैच्या शेवटच्या तीन आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून तब्बल अडीच हजार कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यात मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाने
    नालासोपारा शहरातून नुकतेच एक हजार 400 करोड रुपये किमतीचे ड्रग्ज साठा जप्त केला. नालासोपार्‍याच्या हनुमान नगर परिसरातून मुंबई पोलिसांनी तब्बल 701 किलो 740 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज ताब्यात घेत पाच जणांना अटक केली आहे.
  •  नवी मुंबई आणि पंजाब पोलिसांनी नुकतीच पनवेलमधील एका वेअरहाऊसमधील कंटेनरमध्ये दुबई येथून लपवून आणलेले 362 कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त केले होते. या कंटेनरमध्ये मार्बल भरून तो जेएनपीटी बंदरमार्गे नवी मुंबईत आणण्यात आला होता. दरम्यान, एनसीबी मुंबई युनिटने अलीकडेच 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात ड्रग्ज तस्करीचे जाळे अमेरिका-नागपूर-मुंबई असल्याचे समोर आले.
  • पहिल्या कारवाईत मुंबईतील टपाल कार्यालयातून कुरिअर पार्सलमधून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे पार्सल अमेरिकेतून नागपूर येथील एका दलालाकडे पाठवण्यात आले होते. तर दुसर्‍या कारवाईत मुंबईतील एका खासगी कुरिअर पार्सलमधून 4.90 किलो
    मेथाक्वॉलोन जप्त करण्यात आले. हे पार्सल न्यूझीलंडला पाठविले जाणार होते. या प्रकरणात ड्रग्ज तस्कर विविध मार्गाचा वापर तस्करीसाठी करीत असल्याचे समोर आले.
अनेक देशांचे भविष्य ड्रग्जमुळे उद्ध्वस्त

ड्रग्जच्या राक्षसाने जगभरातील अनेक देशातील तरुणाईला आपल्या जबड्यात घट्ट जखडलेले आहे. अफगाणिस्तान, बेलीज, बोलीविया,
कोलंबिया, मॅक्सिको, पाकिस्तान, पनामा, पेरू, केनिया, नायझेरिया, आफ्रिका, ब्राझील, अमेरिका अशा अनेक देशातील तरुणाई प्रचंड
संख्येने ड्रग्जच्या आहारी गेली आहे. या विषरुपी नशेच्या दलदलीतून तेथील नागरिकांची सुटका करणे हीच सर्वात मोठी समस्या आज तेथील सरकार समोर आहे. अमेरिके सारखा जगातील सर्वात संपन्न देश देखील ड्रग्जच्या कचाट्यातून स्वतःला वाचवू शकलेला नाही. अमेरिकेत दर दहापैकी तीन तरुण ड्रग्जचे सेवन करतात. या तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अमेरिकन सरकारने गेल्या दहा ते पंधरा वर्षात पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. परंतु त्याला ड्रग्जच्या जाळ्यातून सुटका करून घेणे अद्यापतरी शक्य झालेले नाही. जगाच्या महासत्तेने देखील नशेच्या समस्येपुढे हात टेकलेले असतांना नशेचा हा भस्मासुर आता भारतात हळूहळू आपला वेढा घट्ट करतोय.

आकडेवारी काय सांगतेय?

चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशनच्या 2014 च्या अहवालानुसार, देशातील 65 टक्के तरुणांना ड्रग्जचे व्यसन आहे, ज्यांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे. काही सरकारी आकडेवारीही त्यानुसार देशातील सुमारे 50 लाख तरुण हेरोईन सारख्या ड्रग्जचे व्यसनाधीन आहेत. एवढेच नव्हे तर हेरोईनप्रमाणेच एमडी, मेफेड्रोन, एलएसडी, मेथ, कोकेन आदी आधुनिक ड्रग्जचा वापर तरुणांमध्ये नशेसाठी झपाट्याने वाढत आहे. देशातील सुमारे 90 ते 95 लाख लोकांना दररोज गांजाचे सेवन करणे आवडते. वर्ष 1992 ते 2012 पर्यंत म्हणजे फक्त 20 वर्षांमध्ये, आपल्या देशात भारतात दारूच्या सेवनात 55 टक्के वाढ झाली. 1992 मध्ये, जिथे 300 लोकांपैकी एक व्यक्ती दारूचे व्यसन करत होती, 2012 मध्ये 20 लोकांपैकी एक व्यक्ती दारूचे सेवन करत आहे. साहजिकच आता 30 वर्षांच्या कालावधीत आता हा आकडा अनेक पटींनी वाढला आहे. एकट्या मुंबई ठाण्यात विविध ड्रग्जचे सेवन करणार्‍यांची संख्या तब्बल 15 लाखाच्या घरात आहे असे सूत्र सांगतात.

तस्करीत पाकिस्तानचा सहभाग

सागरी मार्गाने भारतात होणारी ड्रग्जची सर्वाधिक तस्करी पाकिस्तानमधून होत आल्याचे वेळोवेळी तपास यंत्रणांनी उघड केले आहे. गुजरात पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. या दरम्यान एका ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात कराचीतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला भारतीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून पाकिस्तान भारतात सागरी
मार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करीत असल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारतात ड्रग्ज तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. ड्रोन द्वारे फक्त ड्रग्जच नाही तर श्सत्रांचा पुरवठा देखील केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अलीकडच्या काळात गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे मूळ पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा इराणमध्ये असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या नागरिकांची नावेही तपासादरम्यान समोर आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तालिबान आणि अफगाणिस्तानचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत अफूची शेती आहे. जगातील अफूच्या उत्पादनात अफगाणिस्तानचा वाटा 80 टक्के आहे, असे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइमने जाहीर केले आहे. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात अफू पासून तयार होणार्‍या हेरॉइनची भारतात
तस्करी करण्याचे षड्यंत्र पाकिस्तान रचतआहे हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT