Latest

ठाकरे शिवसेना 100 टक्के काँग्रेस बनली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे म्हणायचे की, माझी शिवसेना कधी काँग्रेस होऊ देणार नाही. परंतु, 'उबाठा' अर्थात ठाकरे शिवसेना आता शंभर टक्के काँग्रेस बनली आहे. नकली सेनेचे दुकान बंद होईल, या भीतीमुळे ठाकरे परिवार आता पंजाला मतदान करणार, हे राज्याचे दुर्दैव आहे. त्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. हिंदू म्हणून घ्यायलाही आता त्यांची जीभ कचरत आहे, असे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडले.

कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची महाविजय संकल्प सभा झाली. तपोवन मैदानावर झालेल्या विराट सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

महापूर कालावधीत कोल्हापुरात माणुसकीचे दर्शन झाले. लोकांनी जनावरांना सोडले नाही. परंतु, मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 'मातोश्री'वर एकटे सोडून उद्धव ठाकरे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला गेले होते, असा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

धनुष्यबाण येणार, पंजा कायमचा जाणार

जीवाला जीव देणार्‍या कोल्हापूरवासीयांना नमस्कार, रामराम म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, महायुती आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास असल्याने सभेला जनसागर लोटला आहे.

मंडलिक, माने यांना मत म्हणजे मोदींना मतआणि मोदींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्वांगिण विकास केला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशिल माने आता जिंकल्यात जमा आहेत. 7 मे रोजी विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार होणार. धनुष्यबाण निवडून येणार पंजा कायमचा जाणार.

देशात फक्त मोदी गॅरंटी चालते…

पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व कणखर आहे. त्यामुळे देशात फक्त मोदी गॅरंटी चालते. बाकीच्यांच्या गॅरंटी फेल आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले. प्राण जाये पर वचन न जाये असे त्यांचे जगणे आहे. श्री राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले. जगात भारताला फक्त पंतप्रधान मोदी यांच्यामुळे सन्मान मिळत आहे. जगात एक नंबरचे पंतप्रधान म्हणून मोदी यांची गणना होते. मोदीजींचा कोणी नाद करायचा नाही. विरोधी इंडिया आघाडी म्हणजे येड्यांची जत्रा आहे. म्हणून त्यांच्या नादाला कोण लागत नाही. तरीही फक्त विरोध म्हणून काँग्रेससह इंडिया आघाडी पंतप्रधान मोदी यांना विरोध करत आहे. पण एकटे मोदी सर्वांना भारी पडत आहेत. त्यामुळे अगली बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार असे देशवासियांनी ठरविले आहे.

यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या : पालकमंत्री मुश्रीफ

स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतररत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करुन पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आम्ही व्यासपीठावर विराजमान बहुतांश नेते काँग्रेसवासी आहोत. मात्र काँग्रेसला जे जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केले आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी आणि विकासकामांसाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले. 25 कोटी लोकांना दारिर्द्य रेषेवरआणले. घरे, शौचालय घरोघरी नळाचे पाणी उज्वला गॅस अशा विविध माध्यमातून गरीबांना न्याय दिला. श्री. आंबाबाई,जोतीबा, आराखड्यास निधी द्यावा. तसेच जिल्ह्यातील विविध प्रलंबीत समस्या सोडविण्यासाठी भरघोस मदत करावी.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मोदी सरकारने राममंदीर बांधल्यामुळे आणि काश्मिरमधील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणूकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

खा. धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसने देशात 63 वर्षात केवळ भ्रष्टाचार आणि घोटाळेच केले. मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्त दाखविले आहे. युवक महिला शेतकरी आणि गरीब या घटकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेसने 63 वर्षात केले नाही ते दहा वर्षात केले आहे.

माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, या सभेनंतर कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार विजयाच्या दिशेने घौडदौड करतील. आ. प्रकाश आवाडे यांनी दोन्ही जागा मोठ्या फरकांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. आ. प्रकाश आबीटकर यांनी अब की बार चारशे पार मध्ये कोल्हापुरच्या दोन्ही खासदारांचा समावेश असेल. दिल्लीत जाउन ते मोदींचे हात बळकट करतील. असे सांगितले.
खा. धैर्यशील माने यांनी गेल्या पाच वर्षात 8 हजार 200 कोटींची कामे केल्याचा दावा केला. मी कोणावरही टिका न करता विकासावर लक्ष केंद्रीत केले. खा. संजय मंडलिक यांनी कोल्हापुर लोकसभा मतदार संघात 800 कोटींची कामे केल्याचा दावा केला.इंडिया आघाडीच्या विरोधी उमेदवारापेक्षा त्यांचे प्रवक्तेच जास्त बोलतात असा आरोप करुन जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. असे सांगितले.

महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, आ. विनय कोरे, आ. राजेद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदीता माने, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे, प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, शहर प्रमुख सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदील फरास, रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, आदींसह महायुतीचे नेते पदाधिकरी उपस्थित होते.

मविआ ने शाहू महाराज यांना तिकीट द्यायला नको होते : रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत म्हणाले, यापूर्वी संभाजीराजे यांना राज्यसभेत पाठवून भाजपने त्यांचा सन्मान केला होता. परंतू आता महाविकास आघाडीने कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी द्यायला नको होती. ठिक आहे, निवडणूकीस उभे राहणे त्यांचा अधिकार आहे. पण ते चार मे पर्यंत उभे राहतील त्यानंतर त्यांना बसावे लागेल. असे आठवले म्हणताच सभागृहात एकच हश्या पिकला. अनेक कविता करुन त्यांनी महाविकास आघाडीवर टिका केली. तर मोदींचा जयघोष केला.

त्यांनी मैदानात न येता शेपुट घातली

काँग्रेसचा एक नेता आम्ही मैदानात माती लावून उतरलो की चारीमुंड्या चित केल्याशिवाय राहत नाही असे आव्हान मंडलिकांनादेत आहे. परंतू खा. सदाशिवराव मंडलिक खरोखरच मल्ल होते. आणि त्यांचा मुलगाही मैदानात उतरला आहे. मात्र टिका करणार्‍या या नेत्याने खरे तर लंगोट घालुन मैदानात उतरायला पाहीजे होते. पण तो शेपुट घालुन पळुन गेला असा टोला आ. राजेश पाटील यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. त्याच्या या टिकेला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कोल्हापुर लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरच्या गादीवरुन भावनिक वातावरण निर्माण केले जात आहे. पण यापूर्वी कोल्हापुरच्या जनतेने एकदा संभाजीराजे आणि एकदा मालोजीराजे यांचा पराभव केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT