कोल्हापूर : ज्यांनी कोल्हापूरवर टोल लादला, त्यांना जनतेकडे मत मागण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, कोल्हापूरच्या टोलमुक्तीसाठी 473 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून कोल्हापूरच्या जनतेच्या मानगुटीवर 30 वर्षे बसणारे टोलचे भूत गाडले गेले. टोलमुक्तीच्या या मुद्द्यावरून कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत नागरिक भाजपला मतदान करतील, असा आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
सोमवारी सकाळी आ. पाटील यांनी, रंकाळा परिसरात चाय पे चर्चा उपक्रम राबवला. मॉर्निंग वॉकसाठी येणार्या नागरिकांशी संवाद साधून आ. पाटील यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सत्यजित कदम यांचे कोल्हापूरच्या समाजकारणात मोठे योगदान आहे. वडील शिवाजीराव कदम यांनी, कोल्हापूरचे महापौरपद भूषवले आहे. तर सत्यजित कदम यांनी एक अभ्यासू आणि भ्रष्टाचाराला आळा घालणारे नगरसेवक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कदम यांचा विजय निश्चित असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.
माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही यावेळी संवाद साधला. 2019 च्या महापुरानंतर भाजप सरकारने पूरग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई दिली. पण 2021 च्या महापुरानंतर अजूनही नुकसानीचे पैसे मिळालेले नाहीत. शेतकर्यांची तर महाविकास आघाडी सरकारने क्रूर थट्टा केली आहे. त्यामुळेच कोल्हापूर उत्तरमधील जनता या निवडणुकीत भाजपच्या सत्यजित कदम यांना निवडून देतील, अशी खात्री महाडिक यांनी व्यक्त केली. यावेळी सत्यजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, सुहासअण्णा लटोरे, सुदर्शन पाटील, किरण नकाते, प्रताप देसाई, हेमंत आराध्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.