टोकियो ऑलिम्‍पिकची दिमाखदार कार्यक्रमाने सांगता 
Latest

टोकियो ऑलिम्‍पिकची दिमाखदार कार्यक्रमाने सांगता

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संपूर्ण जगातील क्रीडा रसिकांचे लक्ष वेधलेल्‍या टोकियो ऑलिम्‍पिकची आज दिमाखदार कार्यक्रमाने सांगता  झाली. समारोप सोहळ्यात फटाक्‍यांची अतिषबाजीने सर्वांनी मने जिंकली. पुढील ऑलिम्‍पिक २०२३मध्‍ये पॅरीसमध्‍ये  होणार असल्‍याची अधिकृत घोषणाही यावेळी करण्‍यात आली.

भारतासाठी टोकियो ऑलिम्‍पिक ऐतिहासिक ठरले. एक सुवर्ण, दोन रौप्‍य आणि चार कांस्‍य पदकांसह भारताने सात पदकांवर मोहर उमटवली. समारोप सोहळ्यात स्‍पर्धेत सहभागी झालेले देशांचे खेळाडू आपले ध्‍वज घेवून समारोप कार्यक्रमात सहभागी झाले.

टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍ये कांस्‍य पदक पटकावणारा बजरंग पुनिया बनला भारताचा ध्‍वजवाहक बनला. यावेळी गूड बाय टोकियो, वेलकम पॅरीसची घोषणा झाली आणि खेळाडूंनी एकच जल्‍लोष केला.

कोरोना महामारीचे आव्हान असताना जपानने टोकियो ऑलिम्पिक यशस्वी करून दाखवले. सुरुवातीला यजमान जपानचा ध्वज मंचावर आणण्यात आला. यानंतर सर्व देशांचे झेंडे स्टेडियमध्ये दिमाखात फडकले. हे एक नेत्रदीपक दृश्य होते. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेने जगभरातील लोकांची मने जिंकली. पदकांच्या बाबतीत हे ऑलिम्पिक भारतासाठी सर्वात यशस्वी ठरले. समारोपाच्या प्रसंगी बजरंग पुनिया हा भारताचे ध्वजवाहक राहिला. बजरंगने कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावून देशवासियांची मान उंचावली.

जेव्हा उद्घाटन समारंभ होतो तेव्हा सर्व खेळाडू त्यांचे झेंडे घेऊन चालतात. पण समारोपाच्या कार्यक्रमात सर्व देशांच्या सीमा संपून जगभरातील क्रीडापटू एकत्र येऊन चालतात आणि या क्षणाचा आनंद लुटतात. सर्व देशांच्या खेळाडूंनी 'स्ट्रॉन्ग टुगेदर' चा संदेश दिला. ११ हजार ९० खेळाडू टोकियोला आले. स्पर्धेत एकूण ३४० सुवर्ण, ३३८ रौप्य आणि ४०२ कांस्य पदके खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये पटकाविली.

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये अमेरिकेने ३९ सुवर्ण, ४१ रौप्य आणि ३३ कांस्य यासह एकूण ११३ पदके जिंकली. चीनने २८ सुवर्ण, ३२ रौप्य आणि १८ कांस्यसह एकूण ८८ पदके जिंकली. यजमान जपापने २७ सुवर्ण, १४ रौप्य आणि १७ कांस्य पदके पटकावून पदतालिकेत तिस-या स्थानी राहिला. तर भारत १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदके मिळवून ४८ व्या स्थानी राहिला.

सांगता समारंभात जपानच्या लोककला आणि लोकनृत्यांनी जपानी संस्कृतीचे दर्शन घडवले. कोरोना महामारीचे आव्हान असतानाही अत्यंत शिस्तबद्ध रित्या पार पाडण्यात जपान यशस्वी ठरले.

फ्रान्सचा राष्ट्रध्वज फडकवला..

समारोप समारंभात फ्रेंच राष्ट्रगीत सादर केल्यानंतर स्टेडियममध्ये फ्रेंच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यानंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे काउंटडाउन सुरू झाले. यासह, क्रीडापटू आगामी पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करण्यास सज्ज झाले.

आयफेल टॉवरवर ऑलिम्पिक ध्वज फडकवण्यात आला

समारोपीय कार्यक्रमात टोकियोचे राज्यपाल युरीको कोइके आणि आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी पॅरिसच्या महापौर अॅनी हिडाल्गो यांच्याकडे ऑलिम्पिक ध्वज सुपुर्द केला. पुढील २०२४ ऑलिम्पिक फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येच होणार आहे. या दरम्यान, आयफेल टॉवरवरही ऑलिम्पिक ध्वज फडकवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT