Latest

टोंगा बेटावर समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट, त्सुनामी!

Arun Patil

नुकुअलोफा ; वृत्तसंस्था : टोंगा बेटावर शनिवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट झाला. यानंतर 20 मिनिटांनी त्सुनामी आली. तुफानी लाटा आदळल्याने अनेक घरे कोसळली. स्फोट इतका जबरदस्त होता की, राखेचे लोट 20 कि.मी.वरूनही दिसत होते. राख आणि दगडांच्या तुकड्यांचा परिसरात अक्षरश: पाऊस झाला.

स्फोटानंतर त्सुनामी आली तसे टोंगा सरकारने समुद्रापासून जितके दूर जाता येईल, तितके दूर जा, असा खबरदारीचा इशारा जारी केला. उपग्रहांच्या छायाचित्रातही स्फोटाचा हा प्रसंग कैद झाला आहे. स्फोटानंतर समुद्राच्या लाटा रस्त्यांवर, घरांवर, इमारतींवर आदळू लागल्या. अनेक घरे यात होत्याची नव्हती झाली. मी जेवायला बसलेच होते आणि खिडकीतून बाहेर पाहिले, तर शेजारचे घर मला कोसळताना दिसले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

ज्वालामुखी स्फोटानंतर फिजी आणि न्यूझीलंडमध्येही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखी स्फोट झाला तेव्हा आजूबाजूला बॉम्बस्फोट होत आहेत, असेच सुरुवातीला लोकांना वाटले.

आसमंतातील राखेमुळे टोंगातील विमानसेवा तातडीने रद्द करण्यात आल्या. टोंगा 'जियोलॉजिकल सर्व्हिसेस'नुसार स्फोटाचा परिघ जवळपास 260 कि.मी. आहे.

कुठे आहे टोंगा देश?

टोंगा हा देश म्हणजे दक्षिण प्रशांत महासागरातील 169 बेटांचा समूह आहे. पैकी 36 टोंगा बेटावर लोक राहतात. लोकसंख्या एक लाखावर आहे. 'किंगडम ऑफ टोंगा' नावाने हा देश ओळखला जातो. टोंगात राजेशाही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT