बेंबळे : मिटकलवाडी (ता. माढा) : येथील सासरी घरासमोर अंत्यसंस्कार करतानाचे द़ृश्य. 
Latest

सोलापूर : छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; संतप्त नातेवाईकांनी सासरच्या दारातच केले अंत्यसंस्कार

Arun Patil

टेंभुर्णी/बेंबळे; पुढारी वृत्तसेवा : मिटकलवाडी (ता माढा) येथील अंजली हनुमंत सुरवसे (वय 24) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर अंजलीच्या संतप्त नातेवाईकांनी तिच्या सासरी घरासमोरच तिच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, अंजलीच्या शवविच्छेदन अहवालात संशयास्पद बाबी समोर आल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.

अंजलीचा भाऊ अजय नामदेव कदम (रा उंबरे पागे) यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती हनुमंत गोवर्धन सुरवसे, सासू अन्नपूर्णा गोवर्धन सुरवसे, दीर वैभव गोवर्धन सुरवसे, नणंद राणू विठ्ठल मुळे (रा उंबरे) नणंदेचा पती विठ्ठल नामदेव मुळे (रा. उंबरे पागे) नणंद अंजली थिटे या सहा जणांवर भादवि कलम 306, 498 आ, 323, 504, 506 , 34 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अंजली व हनुमंत यांचा विवाह 2016 मध्ये झाला होता. संशयितांकडून वारंवार अंजलीकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला जात होता.

मागणी पूर्ण होत नसल्याने दिवसभराची शेतीची व घरगुती कामे अंजलीकडून करुन तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. अंजलीला अडीच वर्षाचा एक मुलगा आहे. अंजलीला ऊसतोड टोळीसाठी माहेरहून 2 लाख रूपये घेऊन ये म्हणून मारहाण केली होती. त्यावेळी बहिणीच्या सुखासाठी अंजलीच्या भावाने 50 हजार दिले होते. परंतु तरीदेखील पती, सासू, दीर नणंद व नंदवा यांच्याकडून अंजलीचा छळ सुरूच होता. अंजलीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती. या छळास कंटाळून अंजलीने आत्महत्या केल्याचे तिचा भाऊ अजय कदम यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. अंजलीच्या माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी मयत अंजलीचे अंत्यसंस्कार सासरच्या घरासमोर केले. यावेळी घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. याप्रसंगी टेंभुर्णी पोलिसांनी कडक बंदोबस्त असतानादेखील माहेरच्या नातेवाईकांच्या जमावाने महिलांना पुढे करून मृतदेहाचे दहन घरासमोर केले. सदर घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान संशितांपैकी पती हनुमंत गोवर्धन सुरवसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य फरार आहेत.

चेहर्‍यावर आढळल्या जखमा

घटनेची माहिती मिळताच अंजलीचा भाऊ, फिर्यादी अजय कदम, आई, मामा, चुलते व इतर नातेवाईकांसह मिटकलवाडी येथे शेतामध्ये गेले. शेतामधील विहिरीतील पाण्यात अंजलीच्या घरातील लोक तिचा शोध घेत होते. दरम्यान, विहिरीतील पाण्यावर अंजलीच्या चपला तरंगत होत्या. अंजलीच्या माहेरच्यांनी आजूबाजूला शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसल्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास अंजलीचे पार्थिव पाण्यात मिळून आले. तेव्हा तिच्या चेहर्‍यावर जखमा दिसून आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT